प्रियांका गांधींमुळे भाजपमध्ये धास्ती 

Priyanka-Gandhi
Priyanka-Gandhi

नवी दिल्ली - इंदिरा गांधींची हुबेहूब प्रतिमा अशी ओळख असलेल्या प्रियांका गांधी वद्रा यांच्या बहुप्रतिक्षित राजकारण प्रवेशामुळे सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये आश्‍चर्य, अस्वस्थता, धास्ती, संताप, राग अशा विविध भावभावनांचे अद्भुत मिश्रण झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या. 

गेली वीस वर्षे "येणार-येणार', अशी वेळोवेळी हाळी उठली तरी सक्रिय राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या प्रियांका गांधी यांना कॉंग्रेसने अखेर आज मैदानात उतरवून पक्षाच्या महासचिवपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. त्यातही त्यांच्याकडे वाराणसी-गोरखपूरसारखे भाजपचे अतिप्रतिष्ठित मतदारसंघ असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशाची विशेष जबाबदारी देऊन कॉंग्रेसने षटकारच मारल्याचे राजकीय वर्तुळाचे मत आहे. प्रियांका यांचा प्रभाव प्रत्यक्ष मतपेटीतून किती उमटणार याबद्दल स्पष्टता नसली तरी, सत्तारूढ गोटात मात्र त्यांच्या नुसत्या राजकीय रंगमंच प्रवेशाने भूकंपाचे धक्के जाणवल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, भाजपच्या वेगवेगळ्या कोनांतून आलेल्या प्रतिक्रियादेखील प्रियांका यांच्याबाबत वाटणाऱ्या धास्तीचेच द्योतक ठरल्या आहेत. अमेठीतून लढण्याची तयारी करणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांच्या मते प्रियांका यांना राजकारणात आणून कॉंग्रेसने, राहुल गांधी सपशेल अपयशी ठरल्याची कबुली दिली आहे. पक्षप्रवक्ते संबीत पात्रा म्हणाले की, प्रस्तावित महाआघाडीतील विविध गटांनी अव्हेरल्यावर राहुल यांनी आता कौटुंबिक आघाडी करण्याचे ठरविले आहे. तेव्हा प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशाबाबत भाजपला आश्‍चर्य वाटत नाही, असे पात्रा म्हणाले. आगामी निवडणूक नामदार विरुद्ध कामदार अशी असेल, हे पंतप्रधानांनी आधीच सांगून ठेवल्याचे सांगून पात्रा म्हणाले, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी या क्रमाने आता प्रियांका यांचे नाव आले आहे. त्या पक्षात पुढचा नेता कोण, हे कोणीही सांगू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com