प्रियंका गांधी करणार प्रचार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरवात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज सुरवात झाली असून, 16 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सातव्या टप्प्याअंतर्गत 40 मतदारसंघांत 8 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 फेब्रुवारीला दाखल अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारांना 20 फेब्रुवारीपर्यंत माघार घेता येणार आहे.

कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा दिवसांच्या प्रचार दौऱ्यात प्रियांका यांच्या अमेठी व रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा होणार असून, रायबरेलीसाठी 24 फेब्रुवारी तर अमेठीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आहेत. आणि तेथे प्रियांका गांधींना प्रचार करावा लागणार असल्याने पेच निर्माण झाला आहे.

अपर्णा यादव, बहुगुणांकडून आचारसंहितेचा भंग
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या स्नुषा अपर्णा यादव, तसेच भाजप नेत्या रीटा बहुगुणा यांच्याकडून प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. अपर्णा यांनी पीजी विद्यालयात घेतलेल्या कोपरा सभेसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याव्यतिरिक्त शिवसेनेचे उमेदवार कुमार गौरव उपाध्याय यांनाही आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आघाडीत काही ठिकाणी बिघाडी
अमेठी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व कॉंग्रेसला नाराज, बंडखोर उमेदवारांनी ग्रासल्याचे चित्र आहे. जागावाटपात दुसऱ्या पक्षाला मिळालेल्या मतदारसंघातूनही उमेदवारी दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, त्यात नव्याने भर पडली आहे.

सपच्या वाट्याला आलेल्या अमेठीतून आता कॉंग्रेस नेते संजय सिंह यांच्या पत्नी अमिता सिंह यांनी अर्ज दाखल केला आहे. संजय सिंह यांच्यापासून फारकत घेतलेल्या गरिमा सिंह यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, येथे सपतर्फे गायत्री प्रजापती ही निवडणूक लढवीत आहेत. दुसरीकडे गौरीगंज येथे सपने उमेदवारी दिलेल्या एका विद्यमान आमदाराविरोधात कॉंग्रेसच्या मोहंमद नईम यांनी अर्ज दाखल केला आहे. "यूपी को (कॉंग्रेस-सप) ए साथ पसंद है' असा सूर दोन्ही पक्षांकडून आळवला जात असला, तरी किमान डझनभर ठिकाणी मुख्य लढत ही कॉंग्रेस व सपमध्येच होणार असल्याचे दिसत आहे.

शारदा शुक्‍लांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
समाजवादी पक्षाचे नेते व मंत्री शारदा प्रताप शुक्‍ला यांची आज पक्षाने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. शुक्‍ला यांनी सरोजिनी मतदारसंघातून लोक दलातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रस्तावानुसार, राज्यपाल राम नाईक यांनी ही कारवाई केली.

शाही इमामांचा बसपला पाठिंबा
जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना अहमद बुखारी यांनी आज मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षास (बसप) आपला पाठिंबा जाहीर केला. उत्तर प्रदेशातील मुस्लिमांनी या निवडणुकीत सत्ताधारी पक्षास त्यांची जागा दाखवावी, अन्यथा सर्व पक्ष मुस्लिम समाजाचा फुटबॉलसारखा वापर करतील. असे भुखारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय उलेमा कौन्सिलनेही बसपला पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: priyanka gandhi to campaign in up polls