कटियार यांच्या विधानांमुळे वातावरण तापले

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

स्वतःला रामाचे पुजारी म्हणविणारे रावणाची भाषा बोलत आहेत.
- प्रमोद तिवारी, कॉंग्रेसचे उत्तर प्रदेशातील नेते

प्रियांका गांधी आक्रमक; भाजप बचावाच्या पवित्र्यात
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींबद्दल भाजप नेते विनय कटियार यांनी काढलेल्या उद्‌गारांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द प्रियांका गांधी यांनी कटियार यांचे वक्तव्य भाजपची मानसिकता दर्शविणारे असल्याचा प्रहार केला आहे. रॉबर्ट वद्राही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र आहे.

"अयोध्येत राममंदिर प्रकरणात न्यायालयाचा निकाल प्रतिकूल गेल्यास मंदिरउभारणीसाठी कायदा केला जाईल,' असे पहिले वक्तव्य कटियार यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी प्रियांका गांधींना लक्ष्य केले. "प्रियांका गांधी सुंदर आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्या बाहेर पडल्या नाहीत. त्यांनी प्रचार करावा. त्यांच्याविरुद्ध प्रचारासाठी भाजपच्या आणखी सुंदर महिलांना पाठविले जाईल. प्रियांका गांधींपेक्षा स्मृती इराणी अधिक सुंदर आहेत आणि भाषणही चांगल्या देतात,' अशीही मुक्ताफळे कटियार यांनी उधळली होती.

यावर प्रियांका गांधींनी संतप्त प्रतिक्रिया देताना भाजपच्या मानसिकतेवर टीका केली. भाजपमध्ये अधिक सुंदर उमेदवार असल्याचे त्यांचे म्हणणे खरे आहे. भाजपमधील कर्तृत्ववान अशा सुंदर महिलांनी अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध करूनही त्यांच्याकडे याचदृष्टीने पाहिले जात असेल तर हे हास्यास्पद आहे. त्यांचे वक्तव्य देशातील निम्म्या लोकसंख्येबाबत भाजपची मानसिकता नेमकी कशी आहे हे दर्शविणारे आहे, अशी टीका प्रियांका यांनी केली. त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनीही कटियार यांचे विधान काही राजकीय नेत्यांची मानसिकता दर्शविणारे असल्याची टिप्पणी केली.
या वादात दिल्लीतील "आप' सरकारनेही उडी घेतली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी कटियार यांना महिलांच्या अवमानतेची नोटीस बजावण्याचे जाहीर केले आहे. विनय कटियार आणि महिलांबद्दल अपमानजनक बोलणारे "जेडीयू' नेते शरद यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जावा, यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र पाठविणार असल्याचे मालिवाल यांनी सांगितले. याशिवाय दोन्ही खासदारांविरुद्ध कारवाईसाठी लोकसभाध्यक्षा आणि राज्यसभेचे सभापती यांनाही पत्राद्वारे आवाहन करण्याचे स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे.

Web Title: Priyanka Gandhi laughs at Vinay Katiyar's sexist comment: 'Exposes BJP mindset'