LokSabha 2019 : द्वेषाचा एकत्र मुकाबला करा प्रियांका गांधी

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

अहमदाबाद (पीटीआय) : देशात सर्वत्र द्वेषाची भावना पसरवली जात असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा म्हणाल्या. कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच सभेला मार्गदर्शन करत होत्या. देशात सध्या जे काही घडत आहे, ते पाहून आपण दु:खी आहोत. देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलणाऱ्या कोट्यवधी युवकांच्या रोजगाराचे काय झाले, अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी केली. आगामी निवडणूक ही स्वातंत्र्यसाठीच्या लढाईपेक्षा वेगळी नाही, असेही त्यांनी सांगितले. 

कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात पहिली राजकीय सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गांधीनगर जिल्ह्यात अदलाज गावाजवळ आयोजित सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. मोदी सरकारच्या कारभारावर प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली. सात ते आठ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, की सध्या सत्ताधारी मंडळी जनतेला मुळ मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. रोजगार, शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेवरून सतत प्रश्‍न विचारत राहू. मी भाषण नाही, "मन की बात' करत आहे. पहिल्यांदा आपण गुजरातला आलो आणि साबरमती आश्रमाला भेट दिली. याच ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. देशातील द्वेष, मत्सर दूर करण्यासाठी पुन्हा दुसरा स्वातंत्र्यसंग्राम करण्याची वेळ आली आहे. हा देश बंधुभाव, प्रेम, परस्पर सहकार्यावर चालतो. मात्र आज जे काही घडत आहे, ते पाहून वाईट वाटते. ज्यांनी मोठमोठ्या गप्पा मारल्या, त्यांना जाऊन विचारा, दोन कोटी रोजगाराचे काय झाले, महिला सुरक्षेचे काय, पंधरा लाख रुपयांचे काय झाले. ते काहीच सांगू शकत नाहीत. मतदानातून आपली देशभक्ती प्रकट होणे गरजेचे आहे. त्यांना देशाचा खरा स्वभाव दाखवा. हा स्वभाव द्वेषपूर्ण वातावरणाला प्रेम आणि वात्सल्यात बदल करणारा आहे. 
जागरुकता हीच देशभक्ती 

जागरुक राहण्यासारखी दुसरी देशभक्ती नाही. सजगता, जागरुकता हे आपले शस्त्र आहे. मताधिकार हे शस्त्र आहे. मात्र या शस्त्राने आपल्याला कोणालाही जखम करायची नाही अन नुकसानही करायचे नाही. हेच शस्त्र आपल्याला मजबूत करेल, असे प्रियांका म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com