काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणूनही प्रियांका गांधींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात अधिकृतरित्या केलेला हा प्रवेश आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणूनही प्रियांका गांधींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात अधिकृतरित्या केलेला हा प्रवेश आहे.

काँग्रेसचे सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करून काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. प्रियंका गांधी प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वड्रा (वढेरा) यांच्या पत्नी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, आतापर्यंत प्रियंका यांनी राजकारण प्रवेशाचे संकेत दिले नव्हते. 'प्रियंका यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांची छबी दिसते', अशीही चर्चा सुरू असते.

उत्तर प्रदेशचे मैदान जिंकणे ही लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची बाब असते. हीच बाब ओळखून गेल्या निवडणुकीमध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधून जागा लढविली होती. याचा सकारात्मक परिणाम होत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळाले होते. आता लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Priyanka Gandhi Vadra Joins Active Politics