सीमावासियांनी मराठी मागणी लावून धरणे रास्त - प्रा. मोहन पाटील

सीमावासियांनी मराठी मागणी लावून धरणे रास्त -  प्रा. मोहन पाटील

बेळगाव - भाषाभेद हा व्यापक अर्थाने निरर्थक वाद आहे. पण, भाषेची कुचंबणा जेव्हा होते आणि कोणत्याही कारणाने ती सक्‍ती म्हणून लादली जाते. तेव्हा मग व्यक्‍तीचे बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणून त्याचा विचार करावा लागतो. स्वत:च्या भाषेत बोलण्याचा, व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध असलाच पाहिजेत. या मातीशी जखडून असल्यामुळे सीमावासियांनी मराठी मागणी लावून धरणे रास्त आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोहन पाटील यांनी व्यक्‍त केले. 

कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथे रविवारी (ता. 23) बलभीम साहित्य संघ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. युवा नेते आर. आय. पाटील यांनी संमेलनाचे उद्‌घाटन केले. 

प्रा. पाटील म्हणाले, ""भाषाप्रेम एकाअर्थी संस्कृती प्रेम आहे. भाषेतून त्या भाषिक समुहाची संस्कृती बोलत असते. भारतात अगणिक पोट संस्कृती आहेत. या सर्व पोट संस्कृती ज्या विशाल संस्कृतीमध्ये नांदत आल्या आहेत. त्या आपण भारतीय संस्कृती मानतो. साहित्य हा भाषेच्या संस्कृतीचा परिपक्‍व उद्‌गार असतो. साहित्यातून भाषेचा आणि त्या भाषा संस्कृतीचा परिचय घडत असतो. मराठीला महानुभाव आणि संत साहित्याची मोठी परंपरा आहे. मराठी साहित्य विविध प्रवृत्ती प्रवाहाने समृध्द साहित्य आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""लेखक हा उदारमतवादी असावा. तो समुहात घडणाऱ्या धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक न्ह्यातील माफीचा साक्षीदार असतो. म्हणून तो जबाबदार आणि प्रामाणिक असावा. राजकारण विरहित जगणे, हा शुध्द दांभिकपणा आहे. मानवी मूल्ये आणि जीवनमूल्ये म्हणजेच आजच्या महागदारोळात सांविधानिक मूल्ये जतन करण्याचे राजकारण लेखकाने, कवीने करावे नव्हे. वर्तमान वास्तवात आणि अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या गळचेपीत हेच त्याचे मोठे कर्तव्य आहे.'' 

""साहित्यातून आजमितीला कोणत्या तरी विचारधारेची अथवा विरोधी मतांची पाठराखण न करता अनेकांची अंत:करणे उन्नत व्हावीत, याचे भान वाढीला लागायला हवे. लेखक आणि वाचक यांच्यातील भिन्न भिरूचीने साहित्याच्या बरेवाईटपणावर प्रभाव पडू शकतो. म्हणून वाचकानुनय किंवा "खोबरे तिकडे चांगभलं' या वृत्तीने तो लिहू लागला तर, त्याच्यातील स्वत:च्या पिंडधर्माशी प्रतारणा होते. अशावेळी लेखनकृती आणि लेखननिर्माता याच्याविषयी साहित्यबाह्य संभ्रम वाचकाच्या मनात उद्‌भवू शकतो.'', असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, ""साठोत्तरी साहित्यामध्येच आजच्या संघर्षाचे बीजारोपण झाले होते. साठोत्तरी विविध साहित्य प्रवाहानी आणि प्रवृत्तीनी, विशेष करून अनियतकालिकांच्या चळवळीने मराठी साहित्य या अर्थाने समृध्द केले. साहित्यात अवकाशातील नवे संदर्भ दिसू लागले. पारंपरीक लेखनप्रवृत्तीना नवा आयाम मिळाला. मध्यमवर्गीय खुज्या साहित्य जाणिवांपुढे नवे आव्हान उभे केले. मराठी भाषेचा, वाचन व्यवहार, प्रकाशन व्यवहार आणि समिक्षा व्यवहार आणि नव्या अभिरूचीची जडण घडण या सर्वाना मोकळा अवकाळ प्राप्त झाला.'' 

मराठी साहित्य कुठे? 
भाषेत अनेक परीने, अनेक कालखंडात समृध्द लेखन झाले आहे. अनेकांनी आपले वेगळेपणही सिध्द केले आहे. तरीही भारतीय भाषांत मराठी साहित्याने अपेक्षित उंची गाठली आहे काय? बंगाली, हिंदी, कन्नड, तेलगू आदी भाषा साहित्याच्या तुलनेत मराठी भाषा-साहित्य कोणत्या उंचीवर आहे, असा एक प्रश्‍न काही वेळा मनात येतो. याचे उत्तर आपल्या परीने शोधावे लागेल, असे प्रा. मोहन पाटील म्हणाले.

संबंधीत बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com