अभ्यासक्रमात येणार आता सोशल मीडियाचे धडे

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

भावनिक, बौद्धिक विकासासाठी योग, प्राणायामाचे धडे 
 

नवी दिल्ली : सोशल मीडिया वापराची नैतिक मूल्ये आणि शिष्टाचार, गुगल सर्च अधिक चांगल्या पद्धतीने कसे वापरावे, योग आणि प्राणायाम तसेच नोकरीसाठी वैयक्तिक माहितीपत्राचे लिखाण हे विषय तसे आपल्याला किरकोळ वाटू शकतात, पण विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमामध्ये या घटकांचा समावेश केला आहे. 

देशभरात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी आयोगाने जीवनकौशल्य या वेगळ्या कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती केली असून, यासाठी आठ गुण निश्‍चित करण्यात आले आहेत. कोणत्याही सेमीस्टरमध्ये या संदर्भात गुणदान केले जाईल. विद्यार्थ्यांमधील भावनिक आणि बौद्धिक क्षमता वाढावी तसेच त्यांच्यातील बोली आणि लिखीत अशा दोन्ही संवाद कौशल्यांचा विकास व्हावा म्हणून हा वेगळा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. 

सोशल मीडियापासून सावधान

आपण जेव्हा लिखीत आणि भाषिक कौशल्याचा मुद्दा मांडतो तेव्हा सोशल मीडियातील लिखाणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. जनसंपर्कासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम असून त्याचे फायदे आणि तोटे या दोन्हींचा विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

तुम्ही सोशल मीडियाचा की सोशल मीडिया तुमचा वापर करून घेतंय?

अन्य घटक 
योग्य पद्धतीने शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती लिहिता येणे ही देखील एक कला असून विद्यार्थ्यांना अजून त्याचे गमक समजलेले नाही. शैक्षणिक अभ्यासक्रम आटोपून प्रत्यक्ष नोकरी स्वीकारण्यापूर्वी हे कौशल्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी बाणवणे गरजेचे आहे. वैयक्तिक कौशल्य विकास हा एक महत्त्वाचा घटक असून यामध्ये आंतरवैयक्तिक संबंधांच्या विकासासाठी सहकाऱ्यांवर विश्‍वास ठेवणे, स्वत:च्या प्रतिमेचे उदात्तीकरण, नेटवर्किंग याशिवाय इतरांशी वाटाघाटी करण्याचे तुमचे कौशल्य याबाबीही महत्त्वपूर्ण आहेत, आता त्याचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या अभ्यासक्रमामध्ये तीन ऐच्छिक घटकांचा समावेश असून सर्वसमावेशक मानवी विकास, योग आणि प्राणायाम आणि कृतज्ञता असे तीन घटकांत त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The programme which carries eight credit points can be accommodated in any semester