मोदींकडून अंबानींना सुखाने जगण्याची हमी : राहुल गांधी

पीटीआय
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोदी सरकारने अनिल अंबानी यांना "ऑफसेट' कंत्राट देऊन 30 हजार कोटींचा नफा कमाविण्याची संधी दिल्याचा आरोप कॉंग्रेस सातत्याने करीत आहेत.

नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी केला.

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोदी सरकारने अनिल अंबानी यांना "ऑफसेट' कंत्राट देऊन 30 हजार कोटींचा नफा कमाविण्याची संधी दिल्याचा आरोप कॉंग्रेस सातत्याने करीत आहेत. सरकार व अंबानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, राहुल यांनी त्यावरून मोदी यांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. त्यांनी आज केलेल्या ट्‌विटमध्येही टीकेचा सूर कायम होता.

"झुंजार जवान हुतात्मा झाले आहेत. त्यांचे कुटुंब संघर्ष करीत आहे. 40 जवानांनी बलिदान केले आहे; पण त्यांना "हुतात्मा' दर्जा नाकारण्यात आला आहे. ज्या माणसाने कधीही काहीही दिले नाही, केवळ घेतले त्याला 30 हजार कोटींचे बक्षीस देण्यात आले असून, कायम सुखी आयुष्य जगण्याची हमी त्यांना दिली आहे. मोदी यांच्या "न्यू इंडिया'त स्वागत असो,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

"रिलायन्स कम्युनिकेशन्स'चे अध्यक्ष अनिल अंबानी यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले असल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त राहुल यांनी "टॅग' केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: promises from Modi to Ambani to live happily says Rahul Gandhi