आरोपींचा सन्मान; केंद्रीय मंत्री जयंत सिन्हांच्या कृत्यावर विरोधक भडकले

यूएनआय
रविवार, 8 जुलै 2018

देशभरात अफवेमुळे जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या चिंता वाढल्या असताना खुद्द केंद्रीय मंत्री मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी अशाच एका हल्लाप्रकरणात आरोपींचा सत्कार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिन्हा यांना टीकेला सामोरे जावे लागले. 

नवी दिल्ली : देशभरात अफवेमुळे जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या चिंता वाढल्या असताना खुद्द केंद्रीय मंत्री मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी अशाच एका हल्लाप्रकरणात आरोपींचा सत्कार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिन्हा यांना टीकेला सामोरे जावे लागले. 

या टीकाकारांना उत्तर देताना सिन्हा यांनी म्हटले आहे, की ती मंडळी माझ्या घरी आली होती, मी लोकांचा प्रतिनिधी असल्याने त्यांची भेट घेतली. न्यायालय आणि कायदा याप्रकरणाची चौकशी करत असून, दोषींना निश्‍चितच शिक्षा होईल. रांची उच्च न्यायालयाने या आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्द करत त्यांना जामीन मंजूर केला आहे.'' सिन्हा यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये देशभरातील हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख करताना कायद्याचे राज्य सर्वोच्च असल्याचे नमूद केले. ""अलिमुद्दीन अन्सारी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांच्याबाबतीत जे घडले ते खरोखरच चुकीचे होते, मी त्या घटनेचा निषेधच करतो,'' असेही त्यांनी नमूद केले. अन्सारी प्रकरणातील आरोपींना 29 जून 2017 रोजी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. 

हार्वर्डमध्ये शिकलेले मंत्री मारहाणप्रकरणातील दोषींचा सत्कार करतात ही लाजीरवाणी बाब आहे. -हेमंत सोरेन, विरोधी पक्ष नेते 

सरकार हिंदुत्वाला हवा देत असून केंद्रीय मंत्री मारहाण करणाऱ्यांसोबत उभे ठाकले आहेत, यामुळे घटनांना आणखी प्रोत्साहन मिळेल. 
सीताराम येचुरी, सरचिटणीस माकप 

 

Web Title: Protest against the action of Union minister Jayant Sinha