भविष्य निर्वाह निधीचे पोर्टल हॅक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

भविष्य निर्वाह निधीच्या काही सदस्यांची नावे आणि पत्ताच वेबसाईटवर असून त्यांची नोकरी अथवा कामाची तपशिलवार माहिती दिलेली नाही, असे आयबीने  ईपीएफओला आधीच बजावले होते. 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) च्या सेवानिवृत्ती निधी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे 2.7 करोड सदस्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा चोरीस गेल्याचे समोर आले आहे. ईपीएफओच्या साईटवरुन हा डेटा चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन आयुक्त (सीईसी) यांनी असे लिहीले आहे की, 'हॅकर्सने ईपीएफओच्या आधार सिडींग पोर्टलचा डेटा चोरीस गेला आहे.' त्यांनी या पोर्टलशी संबंधित असुरक्षितता रोखण्यासाठी मंत्रालयाच्या तांत्रिक टीमलाही विनंती केली आहे की http://aadhaar.epfoservices.com/ हे पोर्टल आता तात्पुरते बंद करण्यात यावे. हे पोर्टल कर्मचाऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या भविष्य निर्वाह निधी अकाऊंट्सशी जोडतो.

आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'गुप्तचर यंत्रणेने (IB) ईपीएफओ ला त्यांच्या वेबसाईटवरील डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे याविषयी सांगितले होते.' किती प्रमाणात गैरवापर होईल हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र भविष्य निर्वाह निधीच्या काही सदस्यांची नावे आणि पत्ताच वेबसाईटवर असून त्यांची नोकरी अथवा कामाची तपशिलवार माहिती दिलेली नाही, असे आयबीने  ईपीएफओला आधीच बजावले होते. 

EPFO

भविष्य निर्वाह निधीमध्ये प्रत्येक व्यक्ती वेतनाच्या 12 टक्के रक्कम ठेवत असतो. त्यामुळे वेतनाचा तपशिलही चोरीला जाऊ शकला असता. तसेच बँक खातेधारकांचे खाते क्रमांकाद्वारे त्यांचे पीएफही काढता येऊ शकले असते, असे सायबर सेक्युरीटी तज्ज्ञ आनंद वेंकटनारायण यांनी सांगितले आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

   

Web Title: Provident Fund Portal Hacked