दहशतवादामुळे भारताची धर्मनिरपेक्षता धोक्‍यात:लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

दहशतवादाच्या माध्यमामधून होत असलेल्या छुप्या युद्धामुळे देशामधील धर्मनिरपेक्ष वातावरण धोक्‍यात येत आहे

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून भारताविरोधात जम्मु काश्‍मीर राज्यात खेळल्या जाणाऱ्या छुप्या युद्धामुळे देशामधील धर्मनिरपेक्ष वातावरण धोक्‍यात येत असल्याचा इशारा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे.

"भारतीय सीमारेषेच्या सुरक्षेसंदर्भात आपल्यासमोर असलेल्या इतर आव्हानांबरोबरच देशाविरोधात राबविण्यात येत असलेल्या दहशतवाद व छुप्या युद्धाच्या समस्येने प्रामुख्याने विचार करावयास हवा. दहशतवादाच्या माध्यमामधून होत असलेल्या छुप्या युद्धामुळे देशामधील धर्मनिरपेक्ष वातावरण धोक्‍यात येत आहे. अर्थात सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जम्मु काश्‍मीरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे,'' असे रावत म्हणाले.

रावत यांनी यावेळी जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याच्या आरोपांसंदर्भातही भूमिका स्पष्ट केली. लष्कराचे मुख्यालय व इतर विभागांमध्ये या समस्येसंदर्भात तक्रार कक्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती लष्करप्रमुखांनी यावेळी दिली. यानंतरही तक्रारींचे निवारण न झाल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याचबरोबर, अशा स्वरुपाची तक्रार करणाऱ्या जवानांची माहिती ही गुप्त ठेवण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Proxy war affecting secular fabric of India: Army chief