'पीएसएलव्ही-सी 34' चे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

उपग्रहाबाबत थोडक्यात

1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन 

5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया) 

एकाच वेळी सोडलेले उपग्रह 

33 : रशिया (2014) 

29 : नासा (2013) 

20 : भारत (2016) 

श्रीहरीकोटा - ‘पीएसएलव्ही- सी 34‘ या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मोहिमेस आज (बुधवार) यश आले. आज सकाळी 9.26 मिनिटांनी या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 

या प्रक्षेपणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने अंतराळ क्षेत्रात इस्त्रोने मिळविलेले हे मोठे यश आहे. इस्त्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी आपल्यासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांचे एकूण वजन 1228 किलो होते. भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, जर्मनी व इंडोनेशिया या देशांचेही उपग्रह या वेळी सोडण्यात आले. 

उड्डाणानंतर पन्नास मिनिटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी ‘इस्रो‘चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत. यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्‍य होणार आहे. अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे. भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल. तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे. प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटांनंतर "पीएसएलव्ही‘ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याआधी पीएसएलव्ही-सी 9 च्या साह्याने "इस्रो‘ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते. 

सीओईपीच्या ‘स्वयम्‘चेही प्रक्षेपण 

महासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त ठरणारा "स्वयम्‘ उपग्रह पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) तयार केला आहे. त्याचे प्रक्षेपणही आज श्रीहरिकोटा येथून झाले आहे. जगातील सर्वांत लहान दुसरा असलेला हा उपग्रह तयार करण्यासाठी महाविद्यालयात 2008 पासून संशोधन सुरू होते. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी करार करण्यात आला होता. आतापर्यंत 176 विद्यार्थ्यांनी या उपग्रहाच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तयार केलेला उपग्रह आहे. त्याचा शंभर मिलिमीटर बाय शंभर मिलिमीटर बाय 113 मिलिमीटर एवढा लहान आकार आहे.

Web Title: PSLV-C 34 launched successfully