गोव्यात बारावीच्या मानसशास्त्रास प्रॅक्टीकल्सची जोड

अवित बगळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या वेळापत्रकाच्या तारखा आताच जाहीर करताना बारावीच्या परीक्षेत मानसशास्त्र विषय़ास प्रॅक्टीकलची जोड दिली आहे.
 

पणजी- गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या वेळापत्रकाच्या तारखा आताच जाहीर करताना बारावीच्या परीक्षेत मानसशास्त्र विषय़ास प्रॅक्टीकलची जोड दिली आहे.

केस स्टड़ी रुपाने हे प्रॅक्टीकल विद्यार्थ्याला पूर्ण करावे लागणार आहे. मंडळाने दहावीच्या विषयांत कोणतेही बदल न करता बारावीसाठी फ्रेंच, बॅंकींग टू व इन्शूरन्स टू, इंग्रजी संभाषणशास्त्र विषय उपलब्ध करण्यात आले आहेत. गृहविज्ञान शाखेच्या बारावीसाठी अॅपरल डिझायनिंग अॅण्ड डेकोरेशन, डाईंग अॅण्ड प्रिंटींग, फायबर टू फॅब्रिक अॅण्ड फॅशन मार्केटींग तसेच क्लोथिंग मार्केटींग हे विषय नव्याने सुरु करण्यात आले आहेत.

मंडळाने यंदा सर्व विद्यालयांच्या प्रमुखांशी संवाद साधण्याचे ठरविले. त्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेच्या सभागृहात फोंडा, तिसवाडी व मुरगाव तालुक्यांतील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत, सचिव भगिरथ शेट्ये, सहसचिव जोत्स्ना सरीन व माहिती तंत्रज्ञान विभागाचे भरत चोपडे यांनी संवाद साधला.

मंडळाच्या महत्वाच्या सूचना
1) वाढीव विषयासाठी शिक्षण खात्याकडे अर्ज करतानाच मंडळाकडेही अर्ज करावा, मान्यता गृहित धरू नये, ती नाकारलीही जाऊ शकते.
2) परीक्षा, परीक्षापूर्व आणि परीक्षोत्तर कामांसाठी विद्यालयांनी कर्मचारी, फर्निचर, साहित्य, दूरध्वनी वापरास नकार दिल्यास त्या विद्यालयांची मान्यता रद्द होऊ शकते
3) अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून एकाचवेळी नोंदणी शुल्क घ्यावे, इतर राज्य वा मंडळाच्या विद्यार्थ्यांने बारावीत प्रवेश घेतला तर त्याच्याकडून नोंदणी शुल्क घ्यावे.
4) पती, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण दहावी, बारावीत असेल तर त्या शिक्षक,कर्मचाऱ्याने परीक्षेचे काम करू नये.
5) विद्यार्थ्याला केंद्र बदल करता येणार नाही. 

दहावीची परीक्षा २ एप्रिलपासून
मंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांसमोर केलेल्या सादरीकरणानुसार दहावीची परीक्षा २ एप्रिल रोजी सुरु होऊनच २३ एप्रिल २०१९ रोजी संपेल. दहावीच्या परीक्षेत वेळापत्रक असे २ एप्रिल- पहिली भाषा, ४ एप्रिल- इतिहास, राज्यशास्त्र, ५ एप्रिल - भूगोल, अर्थशास्त्र, ८ एप्रिल- गणित, १० एप्रिय- दुसरी भाषा, १२ एप्रिल- विज्ञान, १३ एप्रिल- तिसरी भाषा. १ ते १२ मार्च सायन्स प्रॅक्टीकल्स.

बारावीची परीक्षा १ मार्चपासून
मंडळाने बारावीत परीक्षा १ मार्चपासून घेण्याचे ठरविले आहे. वेळापत्रक असे १ मार्च-  पहिली भाषा ( इंग्रजी, मराठी), २ मार्च- इंग्रजी संभाषण कौशल्य, ४ मार्च- अकोंटंसी, भौतिकशास्त्र, इतिहास, ६ मार्च- रसायनशास्त्र,  ११ मार्च- जीवशास्त्र, १३ मार्च- गणित, राज्यशास्त्र, १५ मार्च- मानसशास्त्र, १६ मार्च- हिंदी दुसरी भाषा, १८ मार्च- सहकार, बॅंकिंग, तर्कशास्त्र, १९ मार्च-   इंग्रजी दुसरी भाषा, २३ मार्च- भूगोल, २६ मार्च- मराठी दुसरी भाषा. १४ फेब्रुवारीपासून प्रॅक्टीकल्स परीक्षा घेता येईल असे नियोजन मंडळ करत असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Psychoanalysis subject attach practical in goa education