esakal | मसूद हाच पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार; ‘एनआयए’चे विशेष न्यायालयात आरोपपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Masood-Azhar

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी २०० किलोची स्फोटके भरलेली गाडी ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर धडकविली होती. यात चाळीस जवान हुतात्मा झाले होते.

मसूद हाच पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार; ‘एनआयए’चे विशेष न्यायालयात आरोपपत्र

sakal_logo
By
पीटीआय

जम्मू - पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज आरोपपत्र दाखल केले असून जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर हाच या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. मसूदबरोबरच आणखी १८ दहशतवाद्यांची नावे या आरोपपत्रात आहेत. यातील अनेक जण पाकिस्तानी नागरिक आहेत. 

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी २०० किलोची स्फोटके भरलेली गाडी ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर धडकविली होती. यात चाळीस जवान हुतात्मा झाले होते. या प्रकरणी सुरुवातीला कोणतेही धागेदोरे नसताना ‘एनआयए’ने विविध ऑडिओ, व्हिडिओ पुरावे, विविध प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठिराख्यांचे जबाब यांचा अत्यंत सविस्तर अभ्यास करून आणि साखळीची एक एक कडी जोडत आरोप निश्‍चित केले आहेत. पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आणि हल्ला घडवून आणल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. ‘एनआयए’ने आज सादर केलेल्या साडे तेरा हजार पानी आरोपपत्रात पुलवामा प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या अनेक व्यक्तींची नावे आहेत. मसूद, त्याचे दोन नातेवाईक आणि दहशतवादी हेच या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘एनआयए’चे सहसंचालक अनिल शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणातील अनेक बाबी उजेडात आणल्या. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेल्या बॅटरी, मोबाईल फोन आणि काही रसायने ऑनलाइन खरेदी केली होती. या प्रकरणी ‘एनआयए’ने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. मसूद अजहर व्यतिरिक्त या आरोपपत्रात विविध चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या सात दहशतवाद्यांचा आणि चार फरारींचा समावेश आहे. यातील दोघे जण अद्यापही जम्मू-काश्‍मीरमध्ये दडून बसले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपपत्रातील नावे 
पाकिस्तानी नागरिकांमध्ये मसूद, रौफ असगर अल्वी, अम्मार अल्वी, महंमद इस्माईल, महंमद उमर फारुख, महंमद कामरान अली आणि कारी नासीर यांचा समावेश आहे. याशिवाय शकीर बाशीर, इन्शा जान, पीर तारीक अहमद शाह, महंमद अब्बास राथर, बिलाल अहमद कुच्चे. मदासिर अहमद खान, समीर अहमद दार, अशाक अहमद नेनग्रू आणि अदिल अहमद दार यांची नावे आरोपपत्रात आहेत. हे सर्व जण पुलवामामधील रहिवासी आहेत. तसेच, श्रीनगरमधील रहिवासी वाइज उल इस्लाम, बडगाममधील महंमद इक्बाल राथर आणि अनंतनागमधील सज्जाद अहमद भट यांच्या नावांचाही यात समावेश आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ईडी’कडूनही आरोपपत्र
नवी दिल्ली -
दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज हिज्बुल मुजाहिदीन या पाकस्थित दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि इतर अकरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांना निधी पुरविल्याबद्दल या आरोपींना शासन व्हावे आणि त्यांची १.२२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करावी, अशी विनंती दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात ‘ईडी’ने केली. ‘ईडी’ने गेल्या वर्षी काश्‍मीरमध्ये काही जणांच्या संपत्तीवर टाच आणली होती.

loading image
go to top