हल्ल्यामागे आदिल दारच

दहशतवादी आदिल दार
दहशतवादी आदिल दार

श्रीनगर/नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करणारी गाडी ‘जैशे महंमद’चा दहशतवादी आदिल अहमद दार चालवीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्याच वर्षी या संघटनेत दाखल झालेला हा दहशतवादी ‘आदिल अहमद गड्डी टकरानेवाला’ या नावाने कुप्रसिद्ध होता. ‘गुंडीबागचा वकास कमांडो’ या नावानेही त्याला ओळखले जात होते. तो काकापुराचा रहिवासी होता. दार याने बसवर धडकविलेल्या मोटारीत १०० किलो स्फोटके होती व त्यामुळे त्याचा परिणाम भयंकर झाला, असे पोलिसांनी सांगितले. 

या हल्ल्यानंतर दारची छायाचित्रे आणि व्हिडिओ सर्वत्र फिरू लागले. ‘माझे नाव आदिल, मी गेल्या वर्षी जैशे महंमदमध्ये सामील झालो. एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, ज्यासाठी मी जैशमध्ये सामील झालो, ते करण्याची संधी मला मिळाली. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत मी स्वर्गात असेन. काश्‍मीरच्या जनतेसाठी माझा हा अखेरचा संदेश आहे,’ असे दारने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यात तो रायफलीसह ‘जैशे महंमद’च्या बॅनरसमोर उभा असलेला दिसतो.

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्‍मिरात गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवायांमध्ये ‘जैशे’चे बहुतेक बडे म्होरके मारले गेल्यामुळे आजच्या हल्ल्याची तीव्रता पाहून तपास यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहेत. 

खरे तर भारतीय सुरक्षा दलांनी ‘जैशे महंमद’ संघटनेचा जवळजवळ खात्मा करीत आणला होता. २०१७ मध्ये ‘जैश’चा बारामुल्लातील कारवाई प्रमुख खालिद याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. मोहंमद उस्मान हा दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी बनला होता. काश्‍मीर खोऱ्यात, कुठेतरी दूरवर जंगलात लपून बसायचे आणि स्नायपर रायफलने जवानांना टिपायचे असे प्रकार वाढले होते. हे करणाऱ्या नेमबाजांच्या टोळक्‍याचा तो म्होरक्‍या. त्याची आणखी एक ओळख होती. ती म्हणजे तो मौलाना मसूद अजहरचा भाचा. कंदहार विमान अपहरण प्रकरणात डिसेंबर १९९९ मध्ये वाजपेयी सरकारने त्याला सोडून दिल्यानंतर त्याने पाकिस्तानात जाऊन ‘आयएसआय’च्या मदतीने जैशे मोहंमदची स्थापना केली.

२००१ मधील संसद हल्ल्यात त्याच्याच संघटनेचा हात होता. अशा या ‘जैश’च्या संस्थापकाच्या भाच्याला गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार मारले. त्यामुळे ‘जैश’चे कंबरडेच मोडले होते. असे असतानाही ‘जैश’ इतका मोठा हल्ला कसा करू शकली याबाबत विविध तर्कवितर्क लढविले 
जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com