दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर - नरेंद्र मोदी

पुलवामा - सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना जवान.
पुलवामा - सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना जवान.

नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

उरी येथील हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानी हद्दीत ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त केले होते, त्यामुळे पुलवामातील भयंकर हल्ल्यानंतरही अशा प्रकारच्या कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचा सूचक इशारा दिला आहे. ‘सीआरपीएफ’च्या जवानांवरील हल्ला नीच कृत्य आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. सुरक्षा दलांच्या शूर जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश भक्कमपणे उभा आहे, असे ट्विट करून पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आत्मघातकी हल्ला झाल्याचे वृत्त कळाल्यानंतर ‘सीआरपीएफ’चे महासंचालक आर. आर. भटनागर यांच्याशी बोलून माहिती घेतली. गृहमंत्र्यांनी देशाच्या सेवेत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ‘सीआरपीएफ’ जवानांना वंदन केले असून, जखमींच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थनाही केली. गृहमंत्र्यांनी उद्याचा बिहार दौरा रद्द केला आहे. उद्या ते पुलवामा येथे जाऊ शकतात, असे कळते. दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी पंतप्रधान कार्यालय आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतल्याचे आणि संभाव्य कारवाईबद्दल चर्चा केल्याचे समजते. काँग्रेसने या हल्ल्याचा निषेध करताना मोदी सरकारला लक्ष्य केले.

वेंकय्या नायडू (उपराष्ट्रपती) - ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हुतात्म्यांच्या कुटुंबांना धैर्य द्यावे व जखमींच्या प्रकृतीत सुधार पडो, अशी प्रार्थना मी करतो. 

अरुण जेटली (केंद्रीय अर्थमंत्री) - पुलवामातील हा हल्ला भ्याड आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि कधीही विसरता येणार नाही असा धडा शिकवू.

डॉ. जितेंद्रसिंह (पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री) - दहशतवाद्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही; पण सोबतच दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्यांनाही सरकार सोडणार नाही.

राजनाथसिंह (केंद्रीय गृहमंत्री) - हा हल्ला अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. ज्या जवानांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले, त्यांना मी वंदन करतो.

योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री) - हा हल्ला अत्यंत भ्याड व निषेधार्ह आहे. हुतात्मा जवानांच्या प्रती मी शोक व्यक्त करतो. या दुःखदायक घटनेत देशाला एकता दाखविणे आवश्‍यक आहे.

ममता बॅनर्जी (प. बंगालच्या मुख्यमंत्री) - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आपले जवान हुतात्मा झाल्याचे अतीव दुःख होत आहे. आपल्या शूर जवानांना आमचा सलाम.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. हुतात्मांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहे. दहशतवादी शक्तींच्या विरोधात देश ठामपणे उभा आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांप्रती भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. आपण अजून किती जणांचे प्राण गमावणार आहोत?
- मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्‍मीर

जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. एक सैनिक आणि भारतीय नागरिक म्हणून माझे रक्त सळसळतेय. हुतात्मा जवानांना सलाम.
- व्ही. के. सिंह, माजी लष्कर प्रमुख

दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकारने कडक कारवाई करावी. हुतात्म्यांच्या कुंटुंबीयांबरोबर माझी सहवेदना आहे. त्यांचे दुःख मी समजू शकते. कुटुंबातील सदस्य गमावण्याचे दुःख काय असते ते मला माहीत आहे.
- प्रियांका गांधी , काँग्रेसच्या सरचिटणीस

जम्मू-काश्‍मीरची भळभळती जखम
कारगिलच्या घटनेनंतरही 
दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे सत्र 
जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरूच आहे. 
त्यात मोठी किंमत मोजावी लागली आहे.

आतापर्यंत झालेले प्रमुख हल्ले
    २६ ऑगस्ट २०१७ : ‘जैश’च्या तीन अतिरेक्‍यांच्या पुलवामा पोलिस लाइनमधील हल्ल्यात आठ सुरक्षा जवान ठार. 
    २९ नोव्हेंबर २०१६ : लष्कराच्या तोफखाना दलाच्या नागरोटा (जम्मू) तळावर तीन अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान मृत. 
    १८ सप्टेंबर २०१६ : उरीतील (जि. बारामुल्ला) चार पाकिस्तानी अतिरेक्‍यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात १८ जवान ठार, यातील बहुतांश जवान झोपेत होते. तीन हल्लेखोर ठार. त्यानंतर भारताने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला. 
    २५ जून २०१६ : श्रीनगर-जम्मू महामार्गावर पाम्पोरजवळ दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात ८ जवान मारले गेले. 
    ३ जून २०१६ : पाम्पोरजवळ दहशतवाद्यांनी ‘सीआरपीएफ’च्या बसवर हल्ला केला, त्यात दोन जवान ठार, दहशतवाद्यांनी सरकारी इमारतीत आश्रय घेतला. दोन दिवसांच्या धुमश्‍चक्रीत दोन अधिकाऱ्यांसह तिघे जवान ठार, दोन हल्लेखोर मारले गेले. एका नागरिकाचाही मृत्यू. 
    ५ डिसेंबर २०१४ : उरीतील मोहरा येथील लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज असलेल्या सहा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा जवान मारले गेले. 
    २४ जून २०१३ : श्रीनगरजवळील हैदरपोरा येथे शस्त्रविहीन जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ जवान ठार. 
    १९ जुलै २००८ : श्रीनगर-बारामुल्ला रस्त्याला लागून असलेल्या भागात दहशतवाद्यांनी आयईडी पेरले होते, त्याच्या स्फोटात नरबालजवळ दहा जवान मृत. 
    २ नोव्हेंबर २००५ : तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या निवासस्थानाजवळ आत्मघातकी हल्लेखोराने त्याच्या कारमध्ये नौगावजवळ घडवलेल्या स्फोटात तीन सुरक्षा जवान आणि दोन नागरिक मारले गेले. 
    २४ जून २००५ : श्रीनगर शहराबाहेर घडवलेल्या कार बाँबस्फोटात लष्कराचे दोन जवान मारले गेले. 
    ४ ऑगस्ट २००४ : श्रीनगरजवळील राजबाग येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ९ जवान मारले गेले, हल्ल्यावेळी एक दहशतवादीही मारला गेला. 
    ८ एप्रिल २००४ : उरी (जि. बारामुल्ला) येथे ‘पीडीपी’च्या फेरीवेळी ग्रेनेड हल्ल्यात ११ जण मारले गेले. 
    २२ जुलै २००३ : अखनूरजवळील दहशतवादी हल्ल्यात ब्रिगेडियरसह आठ जवान मारले गेले, इतर काही वरिष्ठ अधिकारी जखमी. 
    १४ मे २००२ : जम्मूतील कालूचाक कॅंटोन्मेंट येथे दहशतवाद्यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात ३६ जवान ठार, हल्लेखोर मारले गेले. 
    १७ नोव्हेंबर २००१ : रामबाण (तत्कालीन दोडा जिल्हा) येथे दहशतवाद्यांनी तळावर केलेल्या हल्ल्यात १० सुरक्षा जवान ठार, चार दहशतवाद्यांचा खातमा.
    १ ऑक्‍टोबर २००१ : श्रीनगरमधील जुन्या विधिमंडळ सभागृहाबाहेर दहशतवाद्यांनी केलेल्या कार बाँबहल्ल्यात ३८ जण ठार, तीन हल्लेखोर ठार. 
    १० ऑगस्ट २००० : श्रीनगरमधील रेसिडेन्सी रोड भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड भिरकावला, तेथे जवान गोळा झाले तेव्हा त्यांनी कार बाँबहल्ला केला, त्यात ११ जण ठार. 
    १९ एप्रिल २००० : काश्‍मिरातील घुसखोरीत पहिल्यांदा मानवी बाँबचा वापर, दोन जवान ठार. 
    ३ नोव्हेंबर १९९९ : लष्कराच्या बदामीबाग मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्यात १० जवान ठार. 

तपासासाठी ‘एनआयए’चे तज्ज्ञ
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मिरातील पुलवामा येथील स्फोटाच्या तपासासाठी नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) आणि राष्ट्रीय तपास संस्थेमधील (एनआयए) तज्ज्ञांना जम्मूला पाठविण्यात येणार आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय करण्यात आला. ‘एनआयए’च्या पथकात न्यायवैद्यकतज्ज्ञांचा समावेश असून, ते श्रीनगरला जाऊन पोलिसांना तपासात मदत करतील. ‘एनएसजी’मधील स्फोटकतज्ज्ञही पोलिसांना मदतीसाठी पोहोचत आहेत.

भारताने पाकिस्तानला खडसावले
पुलवामामधील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला खडसावले. हा हल्ला करणाऱ्या जैशे महंमदचा प्रमुख अझर मसूदला दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून सहकार्य मिळत असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठबळ देण्याचे प्रकार थांबवावेत, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले.

दहशतवादाविरोधात भारताला साथ
पुलवामात ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी व्यक्त केली. रशियानेही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताला पाठिंबा व्यक्त केला आहे. या हल्ल्याविरोधात भारताने निर्णायक कारवाई करावी, असे आवाहनही रशियाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com