Pulwama Terror Attackः व्हॅनमालकाची ओळख पटली 

Pulwama Terror Attackः व्हॅनमालकाची ओळख पटली 

नवी दिल्ली ः पुलवामातील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या व्हॅनच्या मालकाची ओळख पटली असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) प्रवक्‍त्याने आज दिली. सज्जाद भट हा व्हॅनमालक "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. 

अनंतनागच्या हेवन कॉलनीतील महंमद जलील अहमद हक्कानी याला ही व्हॅन 2011 मध्ये विकण्यात आली होती. त्यानंतर सात जणांकडे विक्री होत ही व्हॅन अखेरीस दक्षिण काश्‍मीरमधील बिजबेहराचा रहिवासी सज्जाद भट याच्याकडे आली. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या व्हॅनच्या चॅसीचा क्रमांक एमए3ईआरएलएफ1एसओओ183735 असा असून, इंजिन क्रमांक जी12बीएन164140 असा असल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले. स्फोटात उद्‌ध्वस्त झालेल्या या व्हॅनचे अवशेष जुळवून वाहनाचा प्रकार व त्याच्या मालकाची ओळख "एनआयए'ने पटविली आहे. न्यायवैद्यक आणि वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन व्हॅनच्या चॅसी आणि इंजिनाचा क्रमांक मिळविण्यात आला. 

ही गाडी चार फेब्रुवारीला खरेदी करण्यात आली असून, तिचा मालक सज्जाद हा शोपियॉंमधील सिराज उल उलूम या संस्थेत विद्यार्थी होता. तो "जैशे महंमद'मध्ये सामील झाला असून, हाती शस्त्र घेतल्याचे त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकल्याचे या प्रवक्‍त्याने नमूद केले. 

पुलावामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com