पुलवामा हल्ला : माझ्या वडिलांचा मला अभिमान 

sahu
sahu

भुवनेश्‍वर : "माझ्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले, याचा मला गर्व आहे, पण मी त्यांना आता परत पाहू शकणार नाही.'' अशा शब्दांत पुलवामातील हल्ल्यात हुतात्मा झालेला जवान प्रसन्नाकुमार साहू यांची मुलगी रूची हिने अभिमान अन दुःखही व्यक्त केले. 

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (ता. 14) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये ओडिशातील दोन जवानांचा समावेश आहे. हवालदार प्रसन्नाकुमार साहू (सीआरएफ 61 बटालियन) आणि कॉन्स्टेबल मनोजकुमार बेहेरा या जवानांचा मृतांमध्ये समावेश आहे. साहू हे जगतसिंहपूर जिल्ह्यातील नौगाव विभागातील शिखर या गावातील रहिवासी होते तर बेहेरा यांचे मूळ गाव कटक जिल्ह्यातील निआलीतील रत्नपूर आहे. 

हल्ल्यापूर्वी पत्नीशी संवाद 
या दोन्ही जवानांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंबीय दुःखात बुडाले आहे. मनोजकुमार यांचा मेव्हणा देवाशिष बेहेरा म्हणाला की, मनोजकुमारची 2006 मध्ये "सीआरपीएफ' कॉन्स्टेबलपदी निवड झाली होती. ते नुकतेच सुटीत गावी आले होते. कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी गेल्या आठवड्यात ते परतले होते. मनोजकुमार बेहेरा यांचा विवाह 2017 मध्ये झाला असून त्यांच्या मागे पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे. पतीच्या आठवणी जागविताना मनोजकुमारच्या पत्नीचा कंठ दाटून आला होता. "दहशतवादी हल्ला होण्याच्या काही तास अगोदर त्यांनी तिच्याशी फोनवर संवाद साधला होता,' असे तिने सांगितले. 

वडिलांचा अभिमान 
प्रसन्नाकुमार साहू याच्या मृत्यूने नौगान गावात दुःखाची छाया पसरली आहे. वडिलांबद्दल बोलताना साहूची मुलगी रूची म्हणाली, ""माझ्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले, याचा मला गर्व आहे, पण मी त्यांना आता परत पाहू शकणार नाही.'' 

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन 
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज हुतात्मा प्रसन्नाकुमार साहू आणि मनोजकुमार बेहेरा यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सहानुभूती व्यक्त केली, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. ""पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मृत्यूने अत्यंत दुःख झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो,'' असे ट्विट पटनाईक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com