Pulwama Terror Attack: सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाहीय. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी दिल्लीः देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाहीय. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

पुलवामामध्ये गुरुवारी (ता. 14 ) 'सीआरपीएफ' जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले, ''दहशतवाद हा देशाचे विभाजन करण्याचा आणि देश तोडण्याचा प्रयत्न करतो. पण या देशाला तोडण्याचा प्रयत्न कोणतीही शक्ती करू शकत नाही. ज्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे, ते या देशाला किंचितही त्रास देऊ शकत नाहीत. या प्रकरणी हल्लेखोरांना केंद्र सरकार जी काही शिक्षा देण्याचा निर्णय घेईल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय, सुरक्षा दल सरकारसोबत आहोत.

पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले की, 'आम्ही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. दहशतवादाविरोधात आपल्याला कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये आम्ही देशासोबत आहोत'.

दरम्यान, पुलवामा येथे  झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, हुतात्मा वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack Stand With Government No Other Discussion : Rahul Gandhi