दोषींना कडक शिक्षा हवी - जे. पी. नड्डा

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

पीडितांच्या कुटुंबांची आणि नातेवाइकांची विचारपूस; मदतीचा ओघ सुरूच
भुवनेश्‍वर - भुवनेश्‍वरच्या सम रुग्णालयातील आग प्रकरणात रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी गांभीर्याने घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी आज याप्रकरणी दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्ट केले. रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले नड्डा म्हणाले, की ही घटना क्‍लेषदायक, चिंताजनक आणि धक्कादायक आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या असून, त्या दुरुस्तीबाबत राज्य सरकारने कडक पावले उचलण्याची गरज नड्डा यांनी बोलून दाखविली.

भुवनेश्‍वर येथील सम रुग्णालयातील डायलिसीस आणि आयसीयू विभागात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला होता. यात शंभरहून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी सुरू असून, आतापर्यंत चौघांना निलंबित आणि अटक करण्यात आली आहे. आज केंदीय आरोग्यमंत्री नड्डा यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर नड्डा म्हणाले, की या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा व्हायला हवी.

त्याचबरोबर प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्वांचेदेखील संतुलन राखले गेले पाहिजे. दरम्यान, सम रुग्णालयाच्याबाहेर आंदोलन सुरू असून, पीडितांना नोकरी आणि पंधरा लाख रुपये देण्याची मागणी केली जात आहे.

याशिवाय नड्डा यांनी एम्स, कॅपिटल हॉस्पिटल, एएमआरआय हॉस्पिटल, केआयएमएस रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या वेळी नड्डा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पीडितांच्या उपचारांसाठी ओडिशा सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

पीडितांच्या नातेवाइकांना पाच लाख
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज सम रुग्णालयातील पीडितांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. दोन दिवसांपूर्वीच पटनायक यांनी भुवनेश्‍वर आणि कटक रुग्णालयात जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. ओडिशा सरकारने मदत जाहीर करण्याअगोदर शिक्षा अनुसंधान (एसओए) विद्यापीठ यांनी काल जखमींना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. एसओएतंर्गत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड सम हॉस्पिटलचे कामकाज चालते; मात्र विरोधी पक्ष कॉंग्रेसने पीडितांच्या नातेवाइकांना पंचवीस लाख रुपये देण्याची मागणी केली होती. ओपीसीसीचे अध्यक्ष प्रसाद हरिश्‍चंद्रन म्हणाले, की ओडिशा सरकारने दहा लाख आणि केंद्र सरकारने पंधरा लाखांची मदत करणे गरजेचे आहे. सीपीआयचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनीही योग्य मोबदला देण्याची मागणी केली.

येथे आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी आलेलो नाही. जखमींवर योग्य उपाय करणे ही प्राथमिकता आहे. चांगल्या उपचारांसाठी केंद्र सरकार राज्याला मदत करेल. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. राज्य सरकारने रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
- जे. पी. नड्डा, केंदीय आरोग्यमंत्री

Web Title: punishment in sam hospital fire case

टॅग्स