लिपिक भरतीची प्रश्‍नपत्रिका व्हॉटसऍपवर; बीएसएससी सचिवाला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पाटना (बिहार) - बिहारमधील कर्मचारी निवड आयोगाच्या (बीएसएससी) परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू असतानाच व्हॉटसऍपवर व्हायरल झाल्याप्रकरणी आयोगाचे सचिव परमेश्‍वर राम यांना आज (बुधवार) पोलिसांनी ताब्यात घेतले.

पाटना (बिहार) - बिहारमधील कर्मचारी निवड आयोगाच्या (बीएसएससी) परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू असतानाच व्हॉटसऍपवर व्हायरल झाल्याप्रकरणी आयोगाचे सचिव परमेश्‍वर राम यांना आज (बुधवार) पोलिसांनी ताब्यात घेतले.

बीएसएससीच्या वतीने शासकीय नोकरीभरती करण्यात येते. त्यासाठी उमेदवारांच्या विविध टप्प्यातील निवडचाचण्या घेण्यात येतात. रविवारी नावडा जिल्ह्यात लिपीक भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच ही प्रश्‍नपत्रिका व्हॉटसऍप या मेसेंजर ऍपद्वारे व्हायरल झाली. त्यानंतर ही प्रश्‍नपत्रिका एक हजार रुपयांना उपलब्ध असल्याच्या अफवा पसरल्या.

हा सारा प्रकार समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नऊ सदस्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाटनातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनू महाराज यांच्या नेतृत्त्वाखालील या पथकाने आज परमेश्‍वर राम यांच्या निवासस्थानी छापे टाकले. तेथे त्यांना काही पुरावे सापडले. त्यामुळे त्यांनी राम यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आतापर्यंत 27 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बिहारमध्ये यापूर्वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील "टॉपर' प्रकरण उघड झाले होते. या परीक्षेत "टॉप' केलेल्या विद्यार्थिनीला H2O आणि पाण्यातील संबंध सांगता आला नव्हता.

Web Title: Question paper viral on whatsapp; BSSC secretary arrested