राधामोहन यांच्याकडे नागरी पुरवठा खाते

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 मे 2017

  • पासवान आजारी असल्याने बदल
  • हर्षवर्धन यांच्याकडे वने व पर्यावरण
    राष्ट्रपतींनी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश दिले आहेत. या खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांच्यावर परदेशांत उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान प्रकृती अस्वास्थ्यामुळे परदेशात उपचार घेत असल्याने त्यांच्या खात्याचा कार्यभार कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, पासवान हे बिनखात्याचे मंत्री असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राधामोहनसिंह यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. तर, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे वने व पर्यावरण खात्याची जबाबदारी आली आहे.

राष्ट्रपती भवनातून आज सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार राष्ट्रपतींनी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश दिले आहेत. या खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांच्यावर परदेशांत उपचार सुरू आहेत. पुन्हा खात्याची सूत्रे पासवान यांनी स्वीकारेपर्यंत राधामोहनसिंह यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, या कालावधीदरम्यान पासवान हे बिनखात्याचे मंत्री राहतील.

दरम्यान, अनिल माधव दवे यांच्या अकस्मात निधनामुळे रिक्त झालेल्या पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज स्वीकारली. पर्यावरण खात्याचे कार्यालय असलेल्या इंदिरा पर्यावरण भवन परिसरामध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी अनिल माधव दवे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून कामकाजाला प्रारंभ केला.

Web Title: radha mohan singh given additional charge of consumer affairs