"लोकपाल' नसल्यानेच राफेल गैरव्यवहार : अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला. 

नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला. 

"लोकपाल' या एकाच मागणीसाठी हजारे यांचे गेल्या आठ वर्षांतील हे तिसरे मोठे उपोषण आंदोलन असेल. देशात पुन्हा आणीबाणी लागू होण्याची शंका व्यक्त करून हजारे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही लोकपाल, तसेच लोकायुक्त अधिनियम 2013 या कायद्याची अंमलबजावणी केंद्रातील सरकारने केली नाही, हे निंदनीय आहे. राफेल गैरव्यवहाराबाबतचे अनेक कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असा दावा करून हजारे म्हणाले, की त्यांचा अभ्यास करून दोन दिवसांत मी पुन्हा माहिती देईन. लष्कराच्या साधनसामग्रीसारखी अत्यंत संवेदनशील बाब असताना राफेल विमाने बनविण्याच्या कंत्राटात अशा कंपनीला सामील करून घेतले की जिची स्थापना होऊन महिनाही झाला नाही, असा आरोप हजारे यांनी अनिल अंबानी यांचे नाव न घेता केला. 

राष्ट्रीय शेतकरी महापंचायतीने व अनेक शेतकरी संघटनांनी आपल्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तथापि, या साऱ्यांनी राळेगणला येण्याची गरज नाही. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातच उपोषण करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

लोकपालबरोबरच शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन देणे, शेतमालाला दीड पट जास्त भाव देणे याबाबत सरकारने या आधी लेखी आश्‍वासने देऊनही अद्याप काहीही झालेले नाही. आता मी अशा खोट्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवणार नाही व जीवनाच्या अखेरपर्यंत मागण्यांसाठी उपोषण करेन. देशात हुकूमशाही येण्याची भीती आपल्याला वाटत आहे. 
अण्णा हजारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

अण्णांचा ठावठिकाणा कळेना 
अण्णा हजारे दिल्लीत आले की महाराष्ट्र सदनातच उतरतात. केजरीवाल व सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर जे नवे सहकारी त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्या गर्दीमुळे महाराष्ट्र सदनात दहशत म्हणावी असे वातावरण जाणवते. गेल्या वेळी पत्रकारांनी हजारे यांनाच याबाबत सांगितले तेव्हा त्यांनी बऱ्याच लोकांना सदनाबाहेर जाण्यास सांगितले होते. आज ते दिल्लीत येऊनही कोठे आहेत, याचा पत्रकारांना बराच वेळ पत्ताच नव्हता. ते पत्रकारांशी बोलणार आहेत, हे केवळ हरियाना, पंजाब व बिहारच्या पत्रकारांना मुख्यतः कळविण्यात आल्याचे समजते. गतवर्षी रामलीला मैदानावर हजारे यांचे आंदोलन झाले, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या आंदोलनाचे संयोजक म्हणविणाऱ्यांत अनेक संशयास्पद चेहरे असल्याचे दिल्लीकरांनी पाहिले. तेच याही आंदोलनाचे संयोजक आहेत, असे सांगितले जाते.

Web Title: Rafale deal fraud is done due to no Lokpal bill says Anna Hajare