रघुवंश यांच्या निधनानंतर लालु प्रसाद यांना धक्का; तब्येत बिघडली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाचा धक्का राजद प्रमुख लालु प्रसाद यादव यांना बसला आहे.

रांची - माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाचा धक्का राजद प्रमुख लालु प्रसाद यादव यांना बसला आहे. रघुवंश यांच्या निधनानंतर लालु प्रसाद यादव रिम्समध्ये लोकांसोबत जास्त बोलत नसल्याची माहिती समजत आहे. लालुंवर उपचार करत असलेल्या डॉक्टर उमेश प्रसाद यांनी माहिती देताना सांगितलं की, रघुवंश प्रसाद यांचे आणि लालुंचे घनिष्ठ संबंध होते. रघुवंश अनेकदा लालु प्रसाद यांना भेटण्यासाठी रिम्समध्ये आले होते.

दिल्लीतील दंगल सुनियोजित;लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याची पोलिसांची माहिती

राजकीय कारकिर्दीतील जवळच्या सहकाऱ्याच्या जाण्याने दु:खी झालेल्या लालुंच्या आरोग्यवर परिणाम झाला आहे. डॉक्टर उमेश प्रसाद यांनी म्हटलं की, लालु प्रसाद यादव यांचा रक्तदाब सामान्य आहे मात्र रक्तातील साखरेच्या पातळीत चढ उतार होत आहे. याशिवाय त्यांना आधीपासूनच 10 प्रकारची औषधे दिली जात आहेत. लालुंना किडनीचा त्रासही आहे. त्यामुळे त्यांना जेवणासह इतरही अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. लालु प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पेइंग गेस्ट वॉर्डमधून रिम्सच्या केली बंगल्यातच स्पेशल वॉर्ड तयार करून तिथं हलवण्यात आलं आहे.

लालु प्रसाद यादव यांना जेव्हा रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाची बातमी समजली होती तेव्हा त्यांना धक्का बसला होता. रांचीतील रिम्स भवनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रघुवंश यांच्या निधनानंतर त्यांनी बोलणंही कमी केलं आहे. रघुवंश यांनी मृत्यूच्या तीन दिवस आधीच राजदचा राजीनामा दिला होता. रूग्णशय्येवरूनच त्याना हाताने पत्र लिहून राजीनामा पाठवला होता. दरम्यान, लालुंनी राजीनामा स्वीकारला नव्हता. तसंच पत्र लिहून रघुवंश प्रसाद यांना जाऊ नका असंही सांगितलं होतं.

बेरोजगारांना प्रती महिना 15 हजार भत्ता द्या; राज्यसभेत मागणी

झारखंड राजदचे सरचिटणीस आणि लालुंची सेवा करणाऱ्या इरफान अहमद अन्सारी यांनी सांगितलं होतं की, रघुवंश यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लालुंना खूप दु:ख झालं होतं. तेव्हा लालुंनी रघुवंश यांनी लिहिलेला राजीनामा आणि त्यावर दिलेल्या पत्रातून उत्तराची आठवण सांगितल्याचंही अन्सारी म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांपासून लालुंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raghuvansh prasad death affect lalu prasad health sugar level up down