भाजपच्या फुटीरतेच्या राजकारणाचा पराभव करू

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

हातासोबत सायकल असेल आणि सायकलसोबत हात, तर किती वेग राहील याचा विचार करा.
- अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष

लखनौ : सद्‌भाव आणि वैयक्तिक संबंधांचे स्पष्ट दर्शन घडविताना कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचे वारस उत्तर प्रदेशच्या प्रगती, समृद्धी, शांतता आणि लोकांसाठी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या द्वेष आणि फुटीरतेच्या राजकारणात पराभव करण्यासाठी आज एकत्र आले.

कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षादरम्यान आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येताना कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रगती (प्रोग्रेस), समृद्धी (प्रॉस्पेरिटी) आणि शांतता (पीस) या तीन "पी'साठी आघाडी झाल्याचे नमूद केल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यामध्ये "पीपल' (लोक) या आणखी एका "पी'चा समावेश केला.
आज सकाळी खास विमानाने दिल्लीहून येथे आगमन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अखिलेश यादव यांच्या साथीत संयुक्त रोड शोला हजेरी लावली आणि त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीच्या रणनीतीविषयी माहिती दिली. विधानसभेच्या 403 जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि कॉंग्रेस 105 जागा लढविणार आहे.

या निवडणुकीत दोन्ही पक्ष तुमची पसंत आहेत हे लोकांना सांगण्याचे ध्येय बाळगत राहुल आणि अखिलेश यांनी "यूपी को ये साथ पसंद है', या घोषणेसह निवडणूक प्रचाराला सुरवात केली. भरगच्च पत्रकार परिषदेत या दोघांनीही भगव्या पक्षाचा पराभव निश्‍चित करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचा जोरदार संदेश दिला. राम मंदिरावरील प्रश्‍नावर बोलताना राहुल यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे सांगितले. भाजप प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपवर हल्लाबोल चढविणाऱ्या राहुल गांधी यांनी या वेळी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर टीका करणे टाळले. वैयक्तिक पातळीवर मी मायावती आणि कांशीराम यांचा आदर करतो. मायावती आणि भाजपमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

आम्ही एका सायकलची दोन चाके असल्याचे नमूद करत अखिलेश म्हणाले, की आमच्यातील वयामध्ये फारसा फरक नाही आणि आज ही सुरवात आहे. राहुल आणि मी राज्याला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाऊ.

कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षामधील भागीदारी गंगा आणि यमुनेचा संगम असून, ही आघाडी भाजपच्या द्वेष आणि फुटीरतेच्या राजकारणाला उत्तर असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशच्या डीएनएमध्ये बंधूभाव आणि प्रेम आहे; द्वेष नाही. उत्तर प्रदेशच्या युवकांना आम्ही पर्याय आणि नवा मार्ग देऊ इच्छितो. नव्या प्रकारचे राजकारण देण्याची इच्छा आहे. आम्ही एका विचाराच्या आधारावर निवडणूक लढवत आहोत.

अखिलेश उत्तर प्रदेशात चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी कॉंग्रेस सहकार्य करेल.
- राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष

Web Title: rahul gandhi, akhilesh resolves to beat the opponents