...हे गंगा-यमुनेचे मिलन : राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोघांनीही विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. ही आघाडी म्हणजे गंगा-यमुना नदीचे मिलन असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

यावेळी राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, "ज्याप्रमाणे गंगा-यमुना नदीचे मिलन होते. त्याप्रमाणे आमची आघाडी आहे. फुटीच्या आणि द्वेषाच्या राजकारणाला आमची आघाडी उत्तर आहे. अखिलेश आणि माझे संबंध हे केवळ राजकीय नाहीत तर वैयक्तिक पातळीवरही आहेत. आमची आघाडी उत्तर प्रदेशला खरोखरच उपयुक्त ठरेल.' यापूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये "27 साल युपी बेहाल' अशा घोषणेद्वारे प्रचार केला होता. त्यावर उत्तर देताना गांधी म्हणाले, "अखिलेश चांगले आहेत असे मी म्हणालो होतो. मात्र त्यांना काम करू दिले नाही.' भाजप आणि संघावर टीका करताना गांधी म्हणाले, "भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो द्वेष पसरवला आहे त्याला आमची आघाडी संपवून टाकणार आहे. आम्हाला उत्तर प्रदेशमधील तरुणाईला नवा मार्ग, नवे राजकारण दाखवायचे आहे.'

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव हे प्रचारात उतरणार का या प्रश्‍नावर गांधी यांनी काहीही उत्तर न देता केवळ मौन पाळले. मायावती यांच्याबाबत बोलताना गांधी म्हणाले, "मी मायावतींचा आदर करतो. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सरकार चालवले. मात्र काही चुका केल्या. तरी मला त्यांचा आदर वाटतो. भाजपच्या विचारधारेतून भारताला धोका आहे. मात्र मायावती यांच्या विचारधारेतून भारताला कोणताही धोका नाही.'

आमची आघाडी सर्व जागांवर विक्रमी कामगिरी करेल, असा विश्‍वास अखिलेश यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, "राहुल गांधी आणि मी एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र काम करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे. एकाच सायकलचे आम्ही दोन चाके आहोत. एक प्रगतीचे आणि दुसरे समृद्धीचे. सायकल आणि हात हे एक चांगले समीकरण आहे.'

Web Title: Rahul Gandhi - Akhilesh Yadav press conference