गुजरातमध्ये राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे, काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे वा दगडफेकीमुळेही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचे पूर्ण सामर्थ्य लोकांना मदत करण्यासाठी खर्च करु

धनेरा -कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. राहुल हे गुजरातमधील पूरग्रस्त भागास भेट देत असतानाच हा प्रकार घडला. राहुल यांना या दगडफेकीमुळे कोणतीही इजा झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राहुल बनासकंठा जिल्ह्यातील लाल चौक भागामधून हेलिपॅडकडे परतत असतानाच त्यांच्या गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे गाडीची काच फुटली. दगडफेक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. या दगडफेकीमध्ये ताफ्यातील इतर गाड्यांचेही नुकसान झाले. त्याआधी राहुल लाल चौक येथे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. यामुळे राहुल यांनी भाषण आवरते घेऊन येथून माघार घेतली होती. यावेळी काही निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली होती.

दरम्यान, राहुल यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गुंडांकडूनच हल्ला करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.

""नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे, काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे वा दगडफेकीमुळेही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचे पूर्ण सामर्थ्य लोकांना मदत करण्यासाठी खर्च करु,'' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली आहे.

Web Title: Rahul Gandhi attacked in Gujarat