'नमो' ऍपची माहिती अमेरिकी कंपन्यांकडे: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

"पीएमओ'चा खुलासा 
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) राहुल यांचे म्हणणे फेटाळून लावले असून, "केंब्रिज ऍनालिटिका'वरून लोकांचे लक्ष भटकावे यासाठी कॉंग्रेस जाणीवपूर्वक हे आरोप करत आहे, असे "पीएमओ'ने म्हटले आहे. देशातील आघाडीच्या माध्यमसंस्था देखील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी "थर्ड पार्टी सर्व्हिस'चा वापर करतात, "नमो ऍप'वर येणारे यूजर्स हे गेस्ट मोडमध्ये येतात. ऍपच्या वापरासाठी त्यांच्याकडून कोणतीही माहिती घेतली जात नाही. राहुल गांधी आणि कॉंग्रेसला तंत्रज्ञानाची माहिती नसल्याचा टोलाही "पीएमओ'ने लगावला आहे. 

नवी दिल्ली  : "फेसबुक डेटा लिक'मुळे राजकीय वर्तुळामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज "नमो ऍप'च्या विश्‍वासर्हतेवरून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ""हाय! माझे नाव नरेंद्र मोदी, मी देशाचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत ऍपवर साइनअप केल्यानंतर मी तुमचा सगळा डेटा माझ्या अमेरिकी मित्र कंपन्यांना देईन,'' असे खोचक ट्‌विट राहुल यांनी केले आहे. एका फ्रेंच हॅकर्सच्या हवाल्याचा संदर्भ देताना राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. 

मध्यंतरी एका फ्रेंच हॅकरने ट्‌विट करत "नमो' ऍप वापरणाऱ्यांचा आयडी, छायाचित्रे, लिंग आणि नावे यांची माहिती यूजर्सच्या परवानगीशिवाय "थर्ड पार्टी डोमेन'ला दिली जात असल्याचा दावा केला होता. राहुल यांनी या ट्‌विटवरून मुख्य प्रवाहातील माध्यमांवर देखील निशाणा साधला आहे. ही माध्यमे नेहमीप्रमाणे ही बातमी दडवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी भाजपनेही "केंब्रिज ऍनालिटिका' फर्मवरून कॉंग्रेसला धारेवर धरले होते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने या फर्मची मदत घेतल्याचा आरोप भाजपने केला होता. सोशल मीडियावरील माहितीची कथित हेराफेरी केल्याचा ठपका या फर्मवर ठेवण्यात आला आहे. 

कॉंग्रेसची मोहीम 
राहुल गांधी यांच्या टीकेनंतर कॉंग्रेसने सरकारविरोधात सोशल मीडियावरून आक्रमक प्रचार मोहीम सुरू केली आहे. #DeleteNaMoApp या नावाने कॉंग्रेसकडून विशेष ऑनलाइन मोहीम राबविण्यात आली. फ्रेंच सिक्‍योरिटी रिसर्चर एलियट एल्डरसन यांनी केलेल्या दाव्यानुसार, ""मोदी ऍपवर लॉगिन करणाऱ्यांची माहिती यूजर्सच्या परवानगीशिवाय क्‍लेव्हरटॅप या अमेरिकी कंपनीला दिली जात आहे.'' दरम्यान, देशभरातील 50 लाखांपेक्षाही अधिक यूजर्सनी "नमो' ऍप डाउनलोड केल्याचे समजते. 

"पीएमओ'चा खुलासा 
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) राहुल यांचे म्हणणे फेटाळून लावले असून, "केंब्रिज ऍनालिटिका'वरून लोकांचे लक्ष भटकावे यासाठी कॉंग्रेस जाणीवपूर्वक हे आरोप करत आहे, असे "पीएमओ'ने म्हटले आहे. देशातील आघाडीच्या माध्यमसंस्था देखील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी "थर्ड पार्टी सर्व्हिस'चा वापर करतात, "नमो ऍप'वर येणारे यूजर्स हे गेस्ट मोडमध्ये येतात. ऍपच्या वापरासाठी त्यांच्याकडून कोणतीही माहिती घेतली जात नाही. राहुल गांधी आणि कॉंग्रेसला तंत्रज्ञानाची माहिती नसल्याचा टोलाही "पीएमओ'ने लगावला आहे. 

Web Title: Rahul Gandhi BJP Spar Over Tweet On PMs App