मोदींकडून द्वेषाचे राजकारण : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

आता ते आपल्या मूळ स्वभावावर आले असून, लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करून त्यांच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत.

अमेठी : विधानसभा निवडणुकीनिमित्त एकत्र कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने उभे केलेले आव्हान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. आघाडीमुळे मोदींच्या चेहऱ्यावरील रंग उडाला असून, त्यांचे हसूही दिसेनासे झाले आहे. असा टोलाही राहुल यांनी लगावला आहे.

अमेठीत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले, "पहिले खूश होते. मात्र, कॉंग्रेस व सपमध्ये जशी आघाडी झाली तसा त्यांचा चेहरा उतरला आहे. आता ते आपल्या मूळ स्वभावावर आले असून, लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करून त्यांच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी बिहारमध्ये पण हेच केले आणि आता इथेही तेच करत आहेत. मला त्यांना सांगावेसे वाटते की, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा.''

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला काहीही दिले नाही. यामुळे देशाला सांगण्यासारखे मोदींकडे काहीच नाही. केंद्रात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली तर, रद्द केलेले सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येतील. स्थानिक उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, अशी आश्वासने राहुल यांनी बोलताना दिली. मोदींनी येथील जनतेत कितीही विषमता, द्वेषभावना पसरवली तरी, जनता त्यांना कदापी स्वीकारणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: rahul gandhi blames narendra modi for politics of hatred