
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! एकाच गुन्ह्यासाठी होऊ शकतात अनेक शिक्षा, तज्ञ काय सांगतात?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध बदनामीच्या आणखी एका खटल्याची आज (बुधवार) पाटणाच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, राहुल गांधी सुनावणीला पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी मानहानीच्या अशाच एका प्रकरणात सुरत न्यायालयाने गेल्या महिन्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे.
न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीही काढून घेण्यात आली. राहुल गांधी अजूनही जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान बिहारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधींना एकाच गुन्ह्यासाठी अनेकवेळा शिक्षा होऊ शकते का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सुप्रीम कोर्टातील वकील फुजैल खान यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय न्याय व्यवस्था आणि घटनेच्या कलम १३ नुसार एखाद्या व्यक्तीला आरोप किंवा गुन्ह्यासाठी फक्त एकदाच शिक्षा होऊ शकते. परंतु गुन्हेगारी प्रकरणातील तज्ञ सुशील टेकरीवाल यांचे मत विरुद्ध आहे. टेकरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, सुरत न्यायालयाचा निर्णय असूनही पाटणा न्यायालय याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
फुजैल खान म्हणाले, राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याची सुरत न्यायालयात सुनावणी झाली आहे, त्यामुळे आता पाटणा न्यायालयात राहुल यांना सूरत दंडाधिकारी न्यायालयाचा शिक्षेचा आदेश आणि सत्र न्यायालयाचा जामीन आदेश हे सांगावे लागणार आहेत. या आरोपामुळे शिक्षा झाली आणि जामीन देखील मिळाला आहे, हे राहुल गांधींना न्यायालयात सांगावे लागणार आहे. याशिवाय खालच्या कोर्टातून राहुल गांधींना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयात अर्जही दाखल करावा लागणार आहे.
पाटणा येथे सुरू झालेल्या सुनावणीत राहुल गांधींना स्वत: हजर राहण्याची गरज नाही. मात्र जेव्हा त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल तेव्हा त्यांना स्वतः हजर राहावे लागेल, असे वकील फुजैल खान यांनी सांगितले. खरेतर, जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालय आरोपीची संपूर्ण पडताळणी करते. म्हणजेच वैयक्तिक ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवल्यानंतरच जामीन मंजूर करते, अशी माहिती फुजैल खान यांनी आज तक ला दिली आहे.