वद्रांच्या निमित्ताने राहुलवर निशाणा !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

राहुल सध्या पंतप्रधान मोदी व सरकारवर हल्ला करण्यासाठी शेरोशायरीचा आधार घेत आहेत. जागतिक भूक निर्देशांकावरून गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले ट्‌विट भाजपला चांगलेच झोंबले होते. त्याची परतफेड करताना इराणी यांनी, "वद्रा प्रकरणात राहुल यांच्या काव्यात्मक ट्‌विटची प्रतीक्षा आपण आतुरतेने करत आहोत,' असे नवे ट्‌विट आज केले

नवी दिल्ली - फरार असलेला शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याने गांधी घराण्याचे वादग्रस्त जावई रॉबर्ट वद्रा यांच्यासाठी तिकिटे आरक्षित केल्यावरून भाजपने कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. वद्रा यांच्या नव्या उपद्‌व्यापाबद्दल राहुल यांच्या काव्यात्मक ट्‌विटची प्रतीक्षा आपल्याला आहे, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांच्या ताज्या गुजरात दौऱ्यास मिळालेल्या प्रतिसादाने भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र सत्तारूढ भाजपला
गांधी घराण्यावर प्रतिहल्ला करण्याची संधी त्याच घराण्याच्या जावयाने पुन्हा मिळवून दिली. भंडारी याने वद्रा यांना केलेल्या "तिकीट आरक्षण' मदतीची माहिती जगजाहीर झाल्यावर भाजपच्या हाती नवा पत्ता मिळाला व आज दिवसभर भाजपने याच माहितीची रेकॉर्ड लावून ठेवल्याचे दिसत होते. भाजप प्रवक्ते नरसिंह राव म्हणाले, की वृत्त चुकीचे असेल तर कॉंग्रेसने संबंधितांवर तत्काळ अब्रूनुकसानीचा दावा दाखल करायला हवा. मात्र कॉंग्रेस नेतृत्वाची शांतता हा "अपराधाची कबुली' दिसत आहे.

भंडारी याने 2012 मध्ये वद्रा यांच्यासाठी बिझिनेस क्‍लासची तिकिटे बुक केल्याचे आज जाहीर झाले. त्यानंतर उसळलेल्या वादात स्वतः वद्रा यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या दलालाबरोबरच्या संबंधांचा यापूर्वीच इन्कार केल्याचे समजते. राहुल सध्या पंतप्रधान मोदी व सरकारवर हल्ला करण्यासाठी शेरोशायरीचा आधार घेत आहेत. जागतिक भूक निर्देशांकावरून गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले ट्‌विट भाजपला चांगलेच झोंबले होते. त्याची परतफेड करताना इराणी यांनी, "वद्रा प्रकरणात राहुल यांच्या काव्यात्मक ट्‌विटची प्रतीक्षा आपण आतुरतेने करत आहोत,' असे नवे ट्‌विट आज केले. ट्‌विटदावारे प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याबाबत राहुल हे पंतप्रधानांची नक्कल करत असल्याचाही भाजपचा आरोप आहे.

गांधी मायलेक मौनात का? ः सीताराम
भंडारी शस्त्रास्त्र दलाल असल्याने भाजपने संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना मैदानात उतरविले. सीतारामन यांनी, या नव्या प्रकरणात गांधी मायलेक मौनात का गेले आहेत व त्यांचे हे मौन कधी सुटणार, असा सवाल केला. भंडारी याच्या नावावर स्वीस बॅंकेत तब्बल साडेसात लाख फ्रॅंकस्‌ जमा केले गेले आहेत ते कोणी केले, याच्या चौकशीची गरज प्रतिपादन केली. या रकमेचा संबंध वद्रा यांच्या लंडनमधील घराच्या दुरुस्तीशी जोडण्याचा भाजपचा इरादा आहे. मात्र ही तिकिटाची बाब केवळ एका प्रसार माध्यमातील बातमी आहे व भाजपने त्यावर विश्‍वास कसा ठेवला, या प्रश्‍नावर त्यांनी, संबंधित वृत्त खातरजमा करूनच दिलेले असणार, असे सांगितले. प्रत्यक्षात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाची भानगड नुकतीच बाहेर आली तेव्हा याच पक्षाने, माध्यमांतील वृत्ताची शहानिशा करावी लागते, असा पवित्रा घेतला होता.

Web Title: rahul gandhi congress bjp