राहुल यांची भिस्त मनमोहन सिंग यांच्यावरच..!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राहुल यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली असून मुकुल वासनिक हे या समितीचे समन्वयक असतील. राजकीय, आर्थिक, परराष्ट्र व्यवहार, कृषी, रोजगार आणि दारिद्य्र निर्मूलन या विषयांवरील ठरावांसाठी उपसमित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या महाधिवेशनाच्या तयारीसाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या समित्यांची नियुक्ती केली आहे. दिल्लीत 16 ते 18 मार्च दरम्यान कॉंग्रेसचे महाधिवेशन होणार असून त्यात नवी कार्यकारिणी निवडीप्रमाणेच राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणासोबतच कृषी, रोजगार आणि दारिद्य्र निर्मूलनावरील धोरण स्पष्ट करणाऱ्या ठरावातून निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 

राहुल यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली असून मुकुल वासनिक हे या समितीचे समन्वयक असतील. देशातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांसंदर्भात पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी या मसुदा समितीचे स्थान अत्यंत संवेदनशील असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजकीय, आर्थिक, परराष्ट्र व्यवहार, कृषी, रोजगार आणि दारिद्य्र निर्मूलन या विषयांवरील ठरावांसाठी उपसमित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय ठरावाचा मसुदा तयार करणाऱ्या उपसमितीमध्ये 25 सदस्य असतील. माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी हे अध्यक्ष तर कुमारी शैलजा समन्वयक असतील. 

कॉंग्रेसमधील कार्यकारिणी या सर्वोच्च संस्थेच्या बरखास्तीनंतर तिची जागा घेणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीत महाधिवेशनाच्या तारखा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअम येथे महाधिवेशन होईल. त्यासाठी खजिनदार मोतीलाल व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समिती नेमण्यात आली असून ऑस्कर फर्नांडिस हे समन्वयक आहेत. या समितीत 14 सरचिटणीस आणि नऊ प्रभारींचा समावेश आहे. या समितीमध्ये नऊ नेते विशेष निमंत्रित आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली घटनादुरुस्ती समिती नेमण्यात आली आहे. संघटना सरचिटणीस जनार्दन द्विवेदी हे या समितीचे समन्वयक असून त्यात दहा सदस्यांचा समावेश आहे. 

Web Title: rahul gandhi congress manmohan singh