सरकारचा खोटेपणा झाकण्यासाठीच काँग्रेसवर आरोप:राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

39 भारतीय इराकमध्ये ठार झाले. यासंदर्भात माहिती देताना सरकार खोटे बोलले. यावरुन माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी कॉंग्रेस व माहितीचोरी करणाऱ्या कंपनीमध्ये हातमिळवणी असल्याचा हा आरोप करण्यात आला आहे

नवी दिल्ली - काँग्रेस व केंब्रिज ऍनालिटिका या संस्थेमध्ये संबंध असल्याचा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आरोप इराकमध्ये इस्लामिक स्टेटने (इसिस) ठार केलेल्या 39 भारतीयांना वाचविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केल्याची टीका काँग्रेस  अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली.

"39 भारतीय इराकमध्ये ठार झाले. यासंदर्भात माहिती देताना सरकार खोटे बोलले. यावरुन माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी काँग्रेस व माहितीचोरी करणाऱ्या कंपनीमध्ये हातमिळवणी असल्याचा हा आरोप करण्यात आला आहे. यामुळे माध्यमांचे लक्ष याकडे वळेल आणि ठार करण्यात आलेल्या 39 भारतीयांविषयी सरकारवर टीका होणार नाही,'' असे राहुल यांनी म्हटले आहे.

इराकमध्ये इसिसने ठार केलेल्या भारतीयांविषयीची माहिती द्यावयास सरकारने इतका विलंब का लावला, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या दोन मुद्यांवरुन भाजप व काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राहुल यांची टीकाही या पार्श्‍वभूमीवर अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

अमेरिकेपासून नायजेरियापर्यंतच्या अनेक देशांच्या निवडणुकांत अनेक भानगडींसह वैध-अवैध मार्गांनी हस्तक्षेप केल्याचे व लोकांच्या डेटा चोरीचेही आरोप असेलल्या "केंब्रिज ऍनालिटीका' या कंपनीशी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने हातमिळवणी करून 2019 ची निवडणूक जिंकण्याचे उद्योग चालविले आहेत, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. याच कंपनीवर तब्बल पाच कोटी भारतीयांचा फेसबुक डेटा चोरण्याचा आरोप असून, याबाबत सरकारने फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनाही सज्जड इशारा दिला आहे. 

झुकेरबर्ग यांनीही या प्रकरणी माफी मागितली आहे. फेसबुकवरच पोस्ट शेअर करत त्यांनी या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण दिले.  

 

Web Title: Rahul Gandhi criticizes BJP Government