'शाह ज्यादा खा गया', राहुल गांधींची भाजप अध्यक्षांवर टीका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

देशातील कोट्यवधी जनतेची नोटाबंदीमुळे आयुष्य बरबाद झाले. त्यामुळे तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. अमित शहाजी अभिनंदन, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या 5 दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम. 

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) सोडले.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला. सुरजेवाला म्हणाले, माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीचे कागदपत्रे जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत बोलणे गरजेचे आहे. नोटाबंदीच्या काळात भाजप आणि आरएसएसने किती संपत्ती खरेदी केली आणि त्याची एकूण रक्कम किती होती, याची माहिती त्यांनी द्यायला हवी. नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे याची सविस्तर आणि निष्पक्षपणे चौकशी केली जावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली. 

तसेच सुरजेवाला यांनी यावेळी अमित शहांवर निशाणा साधला. ते म्हणाले, अमित शहा ज्या बँकेचे संचालक आहेत. त्या बँकेने नोटाबंदीनंतर 10 दिवसांत 745 कोटी रुपये जमा केले. गुजरातमध्ये भाजप नेते संचलित 11 बँकांमध्ये अवघ्या 5 दिवसांमध्ये 3118 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये जमा करण्यात आले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला विश्वास आहे, पंतप्रधान मोदी यावर नक्कीच उत्तर देतील, असेही ते म्हणाले.  

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमित शहांवर निशाणा साधताना ट्विट केले. या टि्वटमध्ये राहुल गांधींनी सांगितले, की देशातील कोट्यवधी जनतेची नोटाबंदीमुळे आयुष्य बरबाद झाले. त्यामुळे तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. अमित शहाजी अभिनंदन, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या 5 दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम. 

Web Title: Rahul Gandhi Criticizes BJP President Amit Shah on Demonetization