सरकार कशाचा जल्लोष करत आहे?: राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 मे 2017

जनादेशाच्या विश्‍वासघाताची ही तीन वर्षे आहेत', अशी तोफ डागली. शेतकरी आत्महत्या करत असताना जवान सीमेवर हुतात्मा होत आहेत, अशा स्थितीत सरकार कशाचा जल्लोष करत आहे

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजपविरोधात कॉंग्रेसने उरलेल्या दोन वर्षांत सरकार विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर "वचनभंग, अकार्यक्षमता आणि जनादेशाच्या विश्‍वासघाताची ही तीन वर्षे आहेत', अशी तोफ डागली. शेतकरी आत्महत्या करत असताना जवान सीमेवर हुतात्मा होत आहेत, अशा स्थितीत सरकार कशाचा जल्लोष करत आहे, असा सवाल त्यांनी केला.

सरकारविरुद्ध गेल्या तीन वर्षांत एकही मोठे आंदोलन उभे करण्यात अपयशी ठरलेल्या कॉंग्रेसने सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी तरुण नेत्यांची फळी आज पुढे केली.

लोकसभेतील उपनेते ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला, आर. पी. एन. सिंह, सुष्मिता देव आणि पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या अभिनेत्री रम्या यांनी मॅरेथॉन पत्रकार परिषद घेतली. मात्र, कॉंग्रेससाठी महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. या तरुण नेत्यांनी पक्ष मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या आश्‍वासनांची पोलखोल करणारी "तीन साल, 30 तिकडम्‌' अशी चित्रफीतही जाहीर केली. सरकारविरोधात येत्या 24 महिन्यांत कॉंग्रेस पक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली व्यापक जन आंदोलन उभारणार असून आज त्याची सुरवात झाल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

''तीन साल 30 तिकडम्‌'
"तीन साल 30 तिकडम्‌' या बारा मिनिटांच्या चित्रफितीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा व इतर भाजप नेत्यांची विरोधाभासी वक्तव्यांचा आधार घेत कॉंग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे. जीएसटी, आधार, आदर्श ग्राम योजना, सीमेवरील जवानांची सुरक्षा, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती, मांस निर्यात, ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळणे, डिजिटल इंडिया, नमामी गंगे, नोटबंदी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ या सारख्या मुद्यांवर लोकसभा निवडणुकीच्या आधीची विधाने आणि सत्तेत आल्यानंतर त्या उलट केलेली विरोधाभासी वक्तव्ये यावर भर देण्यात आला आहे.

Web Title: Rahul Gandhi criticizes government