अमेठीत राहुल का हारले? काँग्रेसचमुळेच!

पीटीआय
सोमवार, 27 मे 2019

अपयशातून धडा न घेतल्याचा परिणाम
राजकीय तज्ज्ञांच्या मते, अमेठीतील काँग्रेसच्या पराभवाची सुरवात २०१२ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच झाली होती. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकच जागा मिळाली होती, तर २०१७ च्या निवडणुकीत पाचही जागा हातातून गेल्या होत्या. इतके सर्व डोळ्यांसमोर घडत असूनही आणि तेही गांधी घराण्याच्या मतदारसंघात काँग्रेस नेतृत्वाने त्याकडे केलेले दुर्लक्ष अनाकलनीय होते. अतिआत्मविश्‍वास आणि जनतेला गृहीत धरण्याची चूक त्यांना फारच महागात पडली.

अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचा गड समजल्या गेलेल्या अमेठीचा यंदा पाडाव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना येथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला. १९८० पासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या या मतदारसंघाने यंदा त्यांची साथ का सोडली, याची काही कारणे आहेत.

या मतदारसंघात विजयी होण्यासाठी गांधी परिवारातील व्यक्तीला कधीही कष्ट पडले नाहीत. या परिवाराभोवती असलेले वलय विजय मिळविण्यासाठी पुरेसे ठरत होते. मात्र, काँग्रेसचा हा बालेकिल्ला काबीज करण्याचा निर्धार भाजपने गेल्या निवडणुकीवेळीच करीत आक्रमक नेत्या स्मृती इराणी यांना राहुल यांच्याविरोधात अमेठीतून उमेदवारी दिली होती. २०१४ च्या त्या निवडणुकीत राहुल यांनी इराणी यांचा पराभव केला होता. तरीही, इराणी यांनी अमेठीलाच कार्यक्षेत्र मानत सातत्याने या मतदारसंघात दौरे केले. 

धुळीने माखलेल्या या गावात त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कष्ट उपले. राहुल यांनीही मतदारसंघाला भेटी दिल्या, तरी त्यांच्या या दौऱ्याचे स्वरूप कायम चाकोरीबद्ध राहिले. मतदारसंघातील दुर्गम भागाशी त्यांची तसा संबंध आलाच नाही. लोकांना वेळ दिला नाही, तर त्यांना मतेही कशी मिळणार? असे येथील एका दुकानदाराने सांगितले. याउलट इराणी यांनी प्रत्येक भेटीवेळी दूरवरील गावागावांत जाऊन जनतेशी थेट संवाद साधला आणि विकासासाठी भाजपला मतदान करण्याची वारंवार विनंती केली. 
या मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट दिल्याने त्याचा जनतेवर सकारात्मक परिणाम झाला.

सल्लागारांनी केला घात
राहुल यांच्या अमेठी दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या त्यांच्या सल्लागारांनीच त्यांचा घात केल्याचे जनतेचे म्हणणे आहे. या सल्लागारांना जनतेची नस ठाऊक नसल्याने राहुल यांच्या आणि नंतरच्या काळात प्रियांका गांधी यांच्या भेटी परिणामशून्य ठरल्या. केवळ मोठ्या गाड्यांमध्ये बसून हात हलविले की तुम्हाला मते मिळतील, असे होणार नाही, असा संदेश जनतेने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi Defeated in Amethi Loksabha Constituency Because of Congress