
Rahul Gandhi News : "सावरकर समझा क्या…"; राहुल गांधींना पोलिसांच्या नोटीसीनंतर काँग्रेसच ट्वीट चर्चेत
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितांवर दिलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांच्या नोटिशीला 10 मुद्यांमध्ये 4 पानांचे उत्तर दिले आहे. अदानीवरील माझ्या वक्तव्यामुळे असे होत आहे का, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला आहे. मी ४५ दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते, त्यावर अचानक नोटीस देण्याची काय गरज? असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी 8 ते 10 दिवसांचा अवधी मागितला आहे. त्याचवेळी काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, 'सावरकर समजलात का... नाव राहुल गांधी आहे'.
दिल्ली पोलीस रविवारी थेट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले होते. राहुल गांधींनी सुमारे 2 तासांनंतर स्पेशल सीपी (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांची भेट घेतली. विशेष सीपींनी सांगितले होते की, आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत माहिती मागवली आहे. राहुल गांधींनी थोडा वेळ मागितला असून माहिती देऊ असे सांगितले.
स्पेशल सीपी हुड्डा यांनी सांगितले की, राहुल म्हणाले की भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक लोकांना भेटले आहेत.त्यामुळे या सर्वांची जुळवाजुळव करण्यासाठी थोडा वेळ लागेल. गरज पडल्यास राहुल गांधींची आणखी चौकशी केली जाईल.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी बलात्कार पीडितेवर वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये म्हणाले होते - अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या. त्या रडत होत्या आणि भावूक झाल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींनी बलात्कार, विनयभंग झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना कळवायचे का, असे मी त्यांना विचारले. तर त्या म्हणाल्या की राहुल जी आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचे होते. यावेळी पोलिसांना सांगू नका, अन्यथा आमचे आणखी नुकसान होईल.
पोलिसांचे एक पथक 15 मार्च रोजी राहुल गांधींना या वक्तव्यासंदर्भात नोटीस देण्यासाठी गेले होते. टीम तिथे 3 तास थांबली, पण राहुल गांधी भेटले नाहीत. 16 मार्च रोजी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्यांच्या घरी गेले. दीड तास वाट पाहिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना नोटीस मिळाली. नोटीसला योग्य वेळी कायद्यानुसार उत्तर देऊ, असे काँग्रेस पक्षाने म्हटले होते.
दिल्ली पोलिसांकडून गंभीर दखल
दिल्ली पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. पीडितेची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांना प्रश्नांची यादी पाठवली. पोलिसांनी त्यांना प्रश्नांची त्वरीत आणि तपशीलवार उत्तरे देण्यास सांगितले होते जेणेकरून पीडितांना सुरक्षा देता येईल.
दिल्ली पोलिसांच्या नोटिशीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने ट्विट केले होते – अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात राहुल गांधीच्या प्रश्नांना सरकार घाबरले आहे आणि पोलिसांची मदत घेत आहे. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर 45 दिवसांनी दिल्ली पोलीस पीडितेची माहिती घेत आहेत.