पत्रास कारण की... मी आता अध्यक्ष नाही : राहुल गांधी 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : राहुल गांधींनी आज संदेश पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय जगजाहीर करून दीड महिन्यापासून चाललेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला. वरिष्ठ नेत्यांचा गट स्थापन करून नवा अध्यक्ष निवडावा, अशी सूचना राहुल यांनी केल्याने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद येईल हे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकारिणीने राजीनामा फेटाळताना संघटनात्मक बदलाचे सर्वाधिकार त्यांना दिले होते. यातून राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारतील, असा आशावादही पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. परंतु राजीनाम्यावर ठाम असलेल्या राहुल गांधींनी आज चार पानी संदेश पत्रातून नवा अध्यक्ष निवड प्रक्रियेत आपला सहभाग नसेल असे स्पष्ट केले. आपल्या ट्विटर हॅन्डलवरून हे पत्र प्रसिद्ध करताना प्रोफाइलमधील "कॉंग्रेस अध्यक्ष' हा शब्द देखील हटवला. 

कॉंग्रेसच्या उज्वल भवितव्यासाठी उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. म्हणूनच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे राहुल यांनी या पत्रात म्हणताना अन्य नेत्यांनी राजीनामे दिले नसल्याची नाराजीही सूचक शब्दांत व्यक्त केली. "पक्षाच्या पुनर्रचनेसाठी कठोर निर्णयाची आवश्‍यकता असून अनेकांना 2019 च्या अपयशाची जबाबदारी घ्यावी लागेल,' असे राहुल यांनी स्पष्ट केले. मात्र "अध्यक्ष या नात्याने स्वतःच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून इतरांना जबाबदार ठरविणे अन्यायकारक आहे,' अशीही पुस्ती त्यांनी जोडली. आपण नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी अनेकांनी सूचना केली होती. परंतु नव्या व्यक्तीने नेतृत्व करणे महत्त्वाचे असल्याने मी निवड करणे योग्य ठरणार नाही. राजीनाम्यानंतर लगेचच मी कार्यकारिणीतील सदस्यांना सुचविले होते, की नव्या अध्यक्षांच्या निवडीचे काम नेत्यांच्या गटाकडे सोपविले जावे. यासाठी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिल्याचेही राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे. 

सत्ताधारी भाजपशी वैचारिक लढाई कायम राहील, असे स्पष्ट करताना राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा संघर्ष राजकीय पक्षाशी (भाजप) नव्हे, तर सरकारी यंत्रणेशी होता असा दावा केला. आता घटनात्मक संस्था निष्पक्ष उरल्या नसून संस्थांवर ताबा मिळविण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लोकशाही दुबळी झाली आहे. यापुढे निवडणुका देशाचे भवितव्य ठरविण्याऐवजी केवळ औपचारिकता म्हणूनच होतील, असाही हल्ला राहुल यांनी सत्ताधाऱ्यांवर चढवला. 

आता पुढे काय? 
राहुल यांच्या राजीनाम्यासोबतच अध्यक्ष या नात्याने राहुल यांनी केलेल्या नियुक्‍त्या संपुष्टात आल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. त्यामुळे नव्याने कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात नव्या अध्यक्षांची निवड होईल. पक्षाच्या घटनेनुसार संघटना सरचिटणीसांना अशी बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे के. सी. वेणुगोपाल लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावतील. या पदासाठी सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रशासन सरचिटणीस मोतिलाल व्होरा यांची नावे चर्चेत आहेत. यात मोतिलाल व्होरा यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आल्याची चर्चा रंगली होती. परंतु स्वतः व्होरा यांनी दुजोरा दिला नाही.

ट्विटर अकाउंटवरील अल्पपरिचयात बदल 
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील अल्पपरिचयातील पक्षाध्यक्षपदाचा टॅग काढून टाकला, ते आता केवळ आखिल भारतीय कॉंग्रेसचे सदस्य राहिले आहेत. दरम्यान राहुल यांनी आज आपण अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहोत, असे स्पष्ट करत पक्षाने नवा अध्यक्ष लवकर निवडावा, असे सूचित केले होते. यानंतर काही तासांमध्ये त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील अल्प परिचयामध्ये बदल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com