पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधीच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर अस्तित्वात आलेल्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होऊन आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 

धोबीपछाड देण्यासाठी, तसेच जागावाटपाबाबत घटक पक्ष आणि संभाव्य मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठीचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे सोपविण्यात आले आहेत. विरोधकांच्या महाआघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती या नेत्यांची नावे घेतली जात असताना राहुल गांधींचे नाव पुढे करून काँग्रेसने या नेत्यांना योग्य तो संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे.

दरम्यान, दीडशे जागा जिंकण्याचा चिदंबरम यांनी मांडलेला प्रस्ताव या बैठकीत अन्य नेत्यांनी फेटाळून लावला. अशा प्रकारे मांडणी करून आपण काँग्रेसची ताकद अल्प असल्याचे मान्य केल्यासारखे होईल, अशी नाराजीही या नेत्यांनी व्यक्त केली.

पूर्वअटींची दखल 
काँग्रेसने आघाडीसाठी प्रयत्न चालविले असले, तरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आघाडीच्या नेतृत्वावरून तसेच जागावाटपावरून पूर्वअटी घातल्याची चर्चा आहे. तर, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनेही जागावाटपात वरचष्मा राखण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यकारिणी बैठकीनंतर पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना परखड भूमिका घेतली.

राहुल यांचे आवाहन
कार्यकारिणीच्या बैठकीच्या माध्यमातून पक्षाला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश देताना राहुल गांधींनी दलित अत्याचार, महिला सुरक्षा, परराष्ट्र धोरण, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा, घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन, रोजगार आदी दहा सूत्री कार्यक्रमावर जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. २०१९ ची लढाई व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर विचारांविरुद्ध असेल. हे उद्दिष्ट लक्षात ठेवून नेत्यांनीही जीभ घसरू न देता भाषेची मर्यादा पाळावी, अशा कानपिचक्‍या राहुल यांनी दिल्या.

पडत्या काळातही काँग्रेसच्या विचारांवर ठाम राहिलेल्या निष्ठावंतांनाच उमेदवारी देताना प्राधान्य दिले जावे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Rahul Gandhi is the face of the Prime Minister congress politics