राहुल गांधी थोडक्यात बचावले; आकाशात विमानाचे हेलकावे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

उड्डाणानंतर साधारण 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हे विमान हेलकावे खाऊ लागले व एका बाजूला झुकल्याने गोंधळ उडाला. तसेच विमानातून विचित्र आवाजही येत होता. याशिवाय विमानातील ‘ऑटोपायलट मोड’ चालू परिस्थितीत नव्हता.   

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीवरून कर्नाटकातील हुबळी येथे जाताना विमानामध्ये बिघाड झाल्याने थोडक्यात बचावले. विमान सुरू झाल्यानंतर उड्डाणानंतर त्यात बिघाड झाला असल्याचे लक्षात आल्याने तारांबळ उडाली. या सर्व घटनेत राहुल गांधी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अचानक घडलेल्या या विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे राजकीय क्षेत्रात संशयाची पाल चुकचुकत आहे. तसेच काँग्रेसमधील वातावरण चांगलेच तापले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी व वैमानिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींसोबत असलेल्या कौशल विद्यार्थींनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काँग्रेसनेही घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत कर्नाटक पोलिस व नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार केली असल्याचे कळते. 

या घटनेबाबतची माहिती अशी की, सकाळी 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास या विमानाने उड्डाण घेतले. या विमानात राहुल गांधींस अन्य चारजणप्रवास करत होते. साधारण दोन तासांनी हे विमान हुबळीत पोहोचणार होतं. उड्डाणानंतर साधारण 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हे विमान हेलकावे खाऊ लागले व एका बाजूला झुकल्याने गोंधळ उडाला. तसेच विमानातून विचित्र आवाजही येत होता. याशिवाय विमानातील ‘ऑटोपायलट मोड’ चालू परिस्थितीत नव्हतं.   

हवामान व्यवस्थित असतानाही असा प्रकार घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे. लगेचच हे विमान हुबळी विमानतळावर उतरवण्यात आले. यातही तीन वेळा प्रयत्न करून शेवटच्या वेळी विमान हुबळी विमानतळावर उतरवण्यात यश आले. राहुल गांधींसह प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटक पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून हा प्रकार समोर आला. 

'मी दिल्लीतून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या विशेष विमानाने प्रवास केला. माझ्यासोबत अन्य चार प्रवासी होते. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रामप्रीत, राहुल रवी, राहुल गौतम या चौघांचा समावेश होता. विमानाने सकाळी 9.20 च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. नियोजित वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता हे विमान हुबळी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, या प्रवासादरम्यान अनेक अनपेक्षित आणि संशयास्पद प्रकार घडले', असे कौशल यांनी या तक्रारीत म्हणले आहे.  

काँग्रेसने याबाबत नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे तक्रार केली आहे व तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे विमान ताब्यात घेऊन वैमानिकाची हुबळीमध्ये चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: rahul gandhi face unexpected failure in aircraft