राहुल गांधीनी राजीनामा द्यावा ही घरातल्याच 'या' प्रमुख सदस्याची होती इच्छा

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत जरी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, अशी घरातल्याच एका सदस्याची म्हणजेच त्यांची बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची होती असे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत जरी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, अशी घरातल्याच एका सदस्याची म्हणजेच त्यांची बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची होती असे सांगण्यात येत आहे.

प्रियंका गांधींनी म्हटलं की, 'भावानं घेतलेल्या निर्णयामागील नेमकं कारण मला माहिती असून, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. दरम्यान राहुल गांधी बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं होतं की, 'निवडणुकीतील पक्षाची कामगिरी पाहता मी अध्यक्षाच्या स्वरूपात काम करू इच्छित नाही, पण मला पक्षासाठी काम करायचं आहे'. तर दुसरीकडे, पक्ष नेतृत्वासाठी एक पर्याय शोधण्यासाठी राहुल गांधींना वेळ द्यावा, असं प्रियंका गांधींनाही वाटत आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली. पण बैठकीत राहुल यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला आहे. 'काँग्रेसनं पक्षानं पराभव स्वीकारला आहे. पण पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच कायम राहतील. पक्षांतर्गत बदल करण्याचे पूर्ण अधिकारही राहुल गांधी यांना देण्यात आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 'काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला असू नये. तसंच प्रियंका गांधींच्या नावाचाही प्रस्ताव अध्यक्षपदासाठी ठेवला जाऊ नये', असेही राहुल गांधींनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सांगितले आहे. जवळपास सहा तास काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू होती. बैठकीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनीही आपापलं म्हणणं मांडलं. राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, असं एकमत सदस्यांनी व्यक्त केलं. सदस्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर राहुल गांधींनी बैठकीला संबोधित केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi get support from priyanka gandhi on quitting issue Congress President Post