"राहुल गांधींना सचिन पायलट आणि सिंधिया यांचा मत्सर वाटतो" 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जुलै 2020

राहुल गांधी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मत्सर करतात. त्यांना वाटतं की, हे दोन्ही नेते पुढे जाऊ लागले तर आपल्याला कोणी विचारणार नाही, अशी बोचरी टीका उमा भारती यांनी केली आहे

भोपाळ- राजस्थानमध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारती यांनी राहुल गांधी यांच्यावर कडवट टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या मत्सरामुळेच काँग्रेसचे पतन होत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

प्रियांका गांधींमुळे पोस्टर पुन्हा झळकले; पायलट 'उड्डाण' रोखणार?
मध्य प्रदेश सरकार असो किंवा राजस्थान सरकार, दोन्ही सरकारे पडण्यामागे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा मत्सर आहे. राहुल गांधी यांना काँग्रेमधील तरुण नेत्यांकडे पाहून हेवा वाटतो. राहुल गांधी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मत्सर करतात. त्यांना वाटतं की, हे दोन्ही नेते पुढे जाऊ लागले तर आपल्याला कोणी विचारणार नाही, अशी बोचरी टीका उमा भारती यांनी केली आहे

राहुल गांधी यांच्या मत्सरामुळे काँग्रेसचा नाश होत आहे आणि तो पुढेही होत राहिल. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायटल हे पुढे चालून युवा पीढीचे नेते बनतील याची राहुल गांधींना भीती असल्याचंही भारती म्हणाल्या आहेत. सचिन आणि ज्योतिरादित्य हे दोघे माझ्या पुतण्यांसारखे आहेत. ज्योतिरादित्य आमच्याकडे आले आहेत, आता सचिन पायलट आमच्याकडे आले तर मला खूप आनंद होईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली आहे.

50 वर्षांपूर्वीच 'नॅनो'सारखी छोटी कार मराठी माणसांनी बनवली होती आणि...
काँग्रेसमधील मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते दिर्घकाळ काँग्रेसशी संबंधीत होत आणि त्यांचा राहुल गांधींच्या युवा टीमचा एक भाग मानलं जायचं. सचिन पायलटही त्याच टीमचा एक भाग आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांना अनेक मोठ्या प्रसंगी राहुल गांधी यांच्यासोबत पाहण्यात आलं आहे.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी पायलट करत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi Jealousy is reason for the fall of Congress