'सीबीआय' प्रकरणी काँग्रेसचे लक्ष्य पंतप्रधान मोदीच!

Rahul Gandhi leads protests against removal of Alok Verma as CBI Director
Rahul Gandhi leads protests against removal of Alok Verma as CBI Director

नवी दिल्ली : 'सीबीआय'चे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा विरोध करत काँग्रेसने दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये आज (शुक्रवार) आंदोलन केले. या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील स्वत: निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. सीबीआयच्या मुख्यालयापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर पोलिसांनी अडविलेल्या एका बसवर राहुल गांधी चढून बसले. 

सीबीआयमधील साठमारीचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नांत असलेल्या काँग्रेसने सुरवातीपासूनच या प्रकरणाचा संबंध राफेल व्यवहाराच्या चौकशीशी जोडला आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच जबाबदार धरले आहे. वर्मा आणि 'सीबीआय'चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णयही राफेल व्यवहाराच्या चौकशीशीच संबंधित असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. 

या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने 'सीबीआय'च्या देशातील सर्व कार्यालयांसमोर निदर्शने करण्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानेही यात काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 'सीबीआय'च्या बहुतांश कार्यालयांबाहेरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

राजधानी दिल्लीतील 'सीबीआय'च्या मुख्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तसेच, येथे आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली. 'राफेल व्यवहाराची चौकशी दडपण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अवलंबिलेल्या निषेधार्ह मार्गाचा विरोध करण्यासाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे', असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. 

काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये नितीशकुमार यांचे एकेकाळचे सहकारी आणि संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव हेदेखील सहभागी झाले. याशिवाय, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते नदिमुल हक यांनीही काँग्रेसला साथ दिली. सीबीआयच्या मुख्यालयापासून दोनशे मीटर अंतरावर काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com