नव्या मुख्यमंत्र्यांना घेऊन राहुल गांधी पाटणाला रवाना

नव्या मुख्यमंत्र्यांना घेऊन राहुल गांधी पाटणाला रवाना

पाटणा : तब्बल 29 वर्षांनंतर कॉंग्रेसची आज (ता. 3) येथे सभा होत असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला "जन आकांक्षा रॅली' असे नाव देण्यात आले आहे. या सभेसाठी राहुल गांधी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांसह विमानाने निघाले आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अहमद पटेल आणि नाना पटोले विमानात उपस्थित आहेत. 

राहुल यांचे वडील राजीव गांधी यांची पाटण्यात 1989 मध्ये सभा झाली होती. त्यानंतर कॉंग्रेसची आज सभा होत आहे. सभेच्या निमित्ताने पाटणा शहर कॉंग्रेसच्या पताका आणि झेंड्यांनी सजले आहे. प्रमुख रस्त्यांवर कॉंग्रेसचे झेंड फडकत आहेत. ऐतिहासिक गांधी मैदानावर होणाऱ्या या सभेचे घोषवाक्‍य "वक्त है बदला का' असे आहे. राज्यात कॉंग्रेस, राजद, रालोसप आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चा या पक्षांची आघाडी आहे.

आजच्या सभेत राजदचे तेजस्वी यादव, "रालोसप'चे उपेंद्र कुशवाह, माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित राहणार आहेत. 

मध्य प्रदेशासह तीन राज्यांत विजय मिळाल्यामुळे बिहारमध्ये जनाधार वाढल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. उच्चवर्णीय, दलित आणि मुस्लिमांची पूर्वी कॉंग्रेसला साथ होती. पण आता हे वर्ग कॉंग्रेसबरोबर नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत असल्यामुळे कॉंग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या.

1995 नंतर लालूप्रसाद यादव यांच्यामागे फरफटत जाणारा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा झाली आहे. आजच्या सभेत राहुल गांधी याबाबत काय बोलणार याची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com