
Rahul Gandhi : काँग्रेसचा नितीश कुमारांना झटका! विरोधी पक्षांच्या बैठकीला राहुल गांधी, खर्गे उपस्थित राहणार नहीत
Rahul Gandhi News : विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी नितीश कुमार कष्ट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीबाबत चर्चा झालेली.
मात्र आता नितीश कुमारांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे हे जाणार नाहीत. हा नितीश कुमारांना मोठा झटका समजला जात आहे. पाटणा येथे येत्या १२ जून रोजी सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे हे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. बिहार प्रदेश काँग्रेस कार्यालयात शनिवारी या बैठीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु आता काँग्रेसचे शीर्षस्थ नेतेच या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की, राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि ते १२ जूनपर्यंत माघारी परतणार नाहीत. नितीश कुमार यांनी अगोदरच यासंबंधी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र आता खर्गे आणि गांधी सहभागी होणार नाही.
आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते १२ जून रोजी सहभागी होतील, असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं.