
Rahul Gandhi : निकालानंतर सगळ्यांनाच धक्का बसेल; काँग्रेस नेते राहुल गांधी
वॉशिंग्टन : देशातील विरोधी पक्ष हे आता बऱ्यापैकी एकवटले असून प्रत्यक्षातही बरेचसे चांगले काम होताना दिसते. सध्या काही सुप्त अंतरप्रवाह आकाराला येऊ लागले असून आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यामुळे लोकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मांडले.
गांधी हे सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून आज त्यांनी येथील ‘नॅशनल प्रेस क्लब’मध्ये माध्यमांशी संवाद साधला. राहुल म्हणाले की, ‘‘येत्या दोन वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळेल.
पुढील तीन ते चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके काय होते ते फक्त पाहा. या राज्यातील कौल आल्यानंतर नेमके काय घडते आहे? हे तुम्हाला समजू शकेल. सध्या विरोधी पक्ष हे बऱ्यापैकी एकवटले असून ते दिवसेंदिवस अधिक एक होताना दिसत आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांसोबत संवाद साधत आहोत.
विरोधी ऐक्याबाबतची चर्चा काहीशी क्लिष्ट स्वरूपाची आहे कारण अनेक ठिकाणांवर आमचा अन्य विरोधी पक्षांसोबत संघर्ष आहे, त्यामुळे आम्हाला थोडी माघार घ्यावी लागू शकते, पण मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे नक्की होऊ शकेल.’’
सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही
राहुल यांनी यावेळी धार्मिक आणि माध्यम स्वातंत्र्यावरही भाष्य केले. अल्पसंख्याकांना होत असलेला त्रास व देशाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी मत मांडले. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेबाबत ते म्हणाले ‘‘ देशातील विविध संस्था आणि माध्यमे यांच्यावर पूर्णपणे कब्जा करण्यात आला असून तुम्हाला हे सगळे माहिती नाही यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. मी जे काही ऐकतो त्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.’’
संस्थांना पूर्ववत करू
काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास अल्पसंख्याकाच्या विकासासाठी आपण कोणत्या योजना राबविणार आहात? असा सवाल विचारला असता राहुल म्हणाले की, ‘‘ भारतामध्ये खूप आधीपासूनच भक्कम व्यवस्था आहे पण तीच व्यवस्था कमकुवत करण्यात आली आहे.
तुमच्याकडे स्वतंत्र संस्था असणे गरजेचे असून त्यावर कुणाचाही दबाव अथवा नियंत्रण असता कामा नये. सध्या भारतामध्ये याच्या नेमकी उलट स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर ही परिस्थिती पूर्ववत करण्यात येईल.’’
संवाद व्यवस्थेवरच दबाव
भारतासारख्या देशामध्ये लोकशाहीसाठी माध्यमांचे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. हा मुद्दा फक्त माध्यमांच्या स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही. सध्या संघटनात्मक चौकटच मोडीत काढण्यात येत आहे. भारतातील लोकांना परस्परांशी बोलू दिले पाहिजे त्यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. भारतीय लोकांमध्ये संवादाचा सेतू उभारणाऱ्या रचनेवरच दबाव आणला जात आहे, असेही राहुल यांनी सांगितले.
विधानसभेत भाजपची वाताहात
येत्या काळामध्ये तीन ते चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपची पूर्ण वाताहात होईल असा दावा राहुल यांनी केला. सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत संरचना आपल्याकडे असून देशातील मोठी लोकसंख्या आजही त्यांच्या पाठीशी नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. प्रतिष्ठित भारतीय अमेरिकी फ्रँक इस्लामकडून आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.