"मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

विजयवाडा, गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी जोरदार प्रतिहल्ला चढविला. "अच्छे दिन' म्हणजे "पुन्हा लूट' असा अर्थ घेत काही लोक बोलतात, अशी टीका माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी केली आहे, तर मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी चिंताक्रांत व अस्वस्थ झाले असून आपली राजकीय घराणेशाही वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कलराज मिश्रा आणि स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

2019 मध्ये कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर लोकांना "अच्छे दिन' पाहायला मिळतील, अशी टीका काल राहुल गांधी यानी केली होती. विजयवाडा येथे एका कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले, ""मोदींनी भ्रष्टाचाराला पायबंद घातल्याने काही जणांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे झाली आहे.''

गांधीनगरला पत्रकारांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, ""सुटीहून परतल्यानंतर मोदी यांची वाढती लोकप्रियता पाहून गांधी यांना अस्वस्थ वाटणे साहजिक आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचे खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत. मोदींवर लोकांचा असलेल्या विश्‍वास हे राहुल यांच्या टीकेला मोठे उत्तर आहे.''
कलराज मिश्रा म्हणाले, ""नोटाबंदी नंतर राहुल गांधींना बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. कॉंग्रेसपुढे आता अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे त्यांच्या नेत्यांना वाटते.''

Web Title: rahul gandhi restless because of modi's popularity