...तर राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

जर विरोधीपक्षांच्या सर्वानुमते पंतप्रधानपदाचा उमेदवार जो ठरेल त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल.

- तेजस्वी यादव, राजद नेते

पाटणा : 'काँग्रेस वर्किंग कमिटी'च्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले, की ''विरोधीपक्ष संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकमताने ज्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल. राहुल गांधी ते नेते असू शकतात''. 

तेजस्वी यादव म्हणाले, की ''सर्व विरोधीपक्ष मिळून एकत्र येतील आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत निर्णय घेतील. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी एकटे नसून, त्यांच्यासोबत आणखी काहीजण असण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या सर्वांच्या नावाची चर्चा होणार असल्याची शक्यता आहे''.

तसेच तेजस्वी यादव पुढे म्हणाले, की जर विरोधीपक्षांच्या सर्वानुमते पंतप्रधानपदाचा उमेदवार जो ठरेल त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल.

Web Title: Rahul Gandhi should support for PMs post says Tejaswi Yadav