मोदींकडून लष्कराचा खासगी संपत्तीप्रमाणे वापर : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 डिसेंबर 2018

सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण होत असल्याच्या लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण होत असल्याच्या लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मि. 56' असा उल्लेख करताना लेफ्टनंट जनरल हुडा यांची प्रशंसा केली आहे. मोदी लष्कराचा खासगी संपत्ती म्हणून वापर करत असल्याची टीकाही राहुल यांनी केली आहे. 

चंडीगड येथील कार्यक्रमामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल हुडा यांनी सर्जिकल स्ट्राइकवरून आता राजकारण सुरू असून, याबाबत डांगोरा पिटण्याची गरज नाही, अशी टिप्पणी केली होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात जाऊन सर्जिकल स्ट्राइक करताना दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. या कारवाईप्रसंगी लेफ्टनंट जनरल हुडा लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांचे भाष्य महत्त्वाचे असल्याने यानिमित्ताने राहुल गांधी यांनी ट्‌विट करून सरकारवर हल्ला चढवला. 

"हुडा सच्च्या सैनिक जनरलप्रमाणे बोलले आहेत. भारताला तुमचा अभिमान आहे. मिस्टर 56 यांना लष्कराचा खासगी संपत्ती म्हणून वापर करताना काहीही शरम वाटत नाही. त्यांनी सर्जिकल स्ट्राइकचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी केला आणि राफेल डीलद्वारे अनिल अंबानींची संपत्ती 30 हजार कोटी रुपयांनी वाढविली,' असे ट्‌विट राहुल यांनी केले आहे. याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींना लक्ष्य करणारे ट्‌विट केले. "मोदींचे हीन राजकारण उघडे पाडल्याबद्दल लेफ्टनंट जनरल हुडा यांचे आभार. आपल्या सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाचा कोणीही स्वतःच्या सवंग राजकारणासाठी वापर करू शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक हिताशी तडजोड करणे आणि अकारण उर बडविण्यासाठी मोदी पूर्णपणे दोषी आहेत,' असा टोला सुरजेवाला यांनी लगावला. 

हुडा यांचे खासगी मत- रावत 

उत्तर विभागाचे विद्यमान प्रमुख लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, यामुळे दहशतवाद निपटून काढण्यात यश आल्याची टिप्पणी केली आहे. लष्कराकडे असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी एक पर्याय सर्जिकल स्ट्राइक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, तर लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी हुडा यांचे खासगी मत असल्याचे म्हणत यावर टिप्पणी करण्याचे टाळले. 

Web Title: rahul gandhi slams narendra modi over surgical strike