कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे राहुल घेणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

मोठ्या देशव्यापी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे निमित्त साधून राहुल गांधी यांच्या मस्तकी अध्यक्षपदाचा मुकुट चढविण्याची संधी साधण्यात येईल, असा होरा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अद्याप एवढ्या निमंत्रणात केवळ आंदोलनाची रूपरेषा एवढाच विषय नमूद केलेला असून, स्थळ अद्याप अनिश्‍चित आहे

नवी दिल्ली - देशभरातील कॉंग्रेसच्या ब्लॉक पातळी ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे भव्य शिबिर 11 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. नोटाबदली मोहिमेच्या विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा ठरविण्यासाठी हे शिबिर असल्याचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याबाबतची घोषणा यानिमित्ताने होऊ शकते, असे कॉंग्रेसच्या गोटातून सुचित करण्यात आले.

नोटाबदली मोहिमेच्या विरोधात कॉंग्रेसने वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन हे सुरू केलेले आहे. या पहिल्या टप्प्याची सांगता नऊ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी 11 जानेवारीला दिल्लीत पक्षाच्या देशभरातील सर्व पातळ्यांवरील पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे 15 हजार कॉंग्रेस पदाधिकारी सामील होतील, असे सांगितले जाते. ब्लॉक पातळीवरील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांपासून तालुका, जिल्हा, प्रदेश कॉंग्रेस समिती यांच्या पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांना या शिबिरासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याखेरिज कॉंग्रेसचे खासदार, आमदार, राष्ट्रीय महासमितीच्या पातळीवरील सर्व पदाधिकारी यांचाही यामध्ये समावेश असेल. कॉंग्रेस महासमितीची बैठक किंवा खुल्या अधिवेशनापेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या शिबिरात केवळ आंदोलनाची रूपरेषा ठरविण्याचा कार्यक्रम केला जाईल हे अशक्‍य आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या देशव्यापी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे निमित्त साधून राहुल गांधी यांच्या मस्तकी अध्यक्षपदाचा मुकुट चढविण्याची संधी साधण्यात येईल, असा होरा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अद्याप एवढ्या निमंत्रणात केवळ आंदोलनाची रूपरेषा एवढाच विषय नमूद केलेला असून, स्थळ अद्याप अनिश्‍चित आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच्या (वाराणसी दौऱ्यानंतरच्या दुखापत व आजारपणानंतर) प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने राहुल गांधी यांनी जवळपास पक्षाची कार्यकारी सूत्रे हाती घेतल्यात जमा आहेत. त्यामुळेच पक्ष संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागण्याच्या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी कॉंग्रेसजनांची इच्छा असल्याचे जाहीरपणे मांडले होते आणि त्याला कार्यकारिणीच्या त्या बैठकीने एकमुखाने पाठिंबा दिला होता. यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीची अध्यक्षता राहुल गांधी यांनीच केली होती. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हल्ली पक्षाचे बहुतेक निर्णय हे राहुलच करीत आहेत. अर्थात सोनिया गांधी या अद्याप अध्यक्ष असल्याने त्यांना सर्व निर्णयांची माहिती दिली जाते आणि त्यांच्या मंजुरीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होते.

Web Title: Rahul Gandhi soon to become Congress President?